15 October 2019

News Flash

पोलीस आयुक्तालयाच्या समस्या मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

(संग्रहित छायाचित्र)

पोलिसांचे काम राज्य करण्याचे नसून सेवेचे आहे, असे सांगत लोकांमध्ये जा आणि त्यांची मनेजिंका. पोलिसांवर विश्वास बसेल, असे वातावरण तयार करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना केल्या. पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या अपुरे मनुष्यबळ आणि वाहनांची कमतरता या समस्या लक्षात आल्या असून त्याविषयी लवकरच निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले,की  वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची गरज होती. आमदार जगताप व लांडगे यांनी यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार, आवश्यक कार्यवाही करण्यात आली. महापालिकेने चांगल्या इमारतीसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित वाटले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न करावेत.

पोलीस आयुक्तालयासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे सहकार्य लाभल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले. प्रास्ताविक पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी आभार मानले.

First Published on January 10, 2019 2:37 am

Web Title: cms assurance to solve the problem of police commissioner