तीन रुपयांनी महाग; घरगुती पाइपगॅसचा दरही वाढला

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा रोजच नवा उच्चांक निर्माण होत असतानाच आता सीएनजी आणि घरगुती वापरासाठीच्या पाईप गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारचे गॅस यापुढे प्रतिकिलो तीन रुपयांनी महाग होणार आहेत. त्यामुळे सीएनजीचे दर प्रतिकिलो ५२ रुपयांवरून ५५ रुपये, तर पाईप गॅसचा दर २६ रुपयांवरून २९ रुपये होणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणारे प्रदूषण आणि आरोग्याचे गंभीर प्रश्न लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २००७ मध्ये प्रवासी वाहनांमधील ऑटो रिक्षा सीएनजी किंवा एलपीजी इंधनावर परावर्तित करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये धावणाऱ्या सर्व रिक्षा सीएनजी इंधनावर परावर्तित करण्यात आल्या आहेत. नव्याने येणाऱ्या रिक्षा सीएनजी इंधनावर असल्यासच त्यास परवानगी देण्यात येते. सद्यस्थितीत रिक्षांची संख्या ६० हजाराहून अधिक आहे. त्याचप्रमाणे पीएमपीच्या सुमारे १२०० बस सीएनजीवर चालविल्या जातात.

मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने अनेकांनी आपली खासगी वाहने सीएनजीवर परावर्तित केली आहेत. त्यामुळे शहरात सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या सद्यस्थितीत दोन लाखांहून अधिक आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून सध्या दोन्ही शहरांमध्ये घरगुती पाईप गॅसची योजना राबविण्यात येत आहे. एलपीजी सिलिंडरपेक्षा पाईप नॅचरल गॅस (पीएनजी) परवडत असल्याने त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सुमारे दीड लाखांच्या आसपास नागरिकांकडे पीएनजी जोड आहे. या सर्व ग्राहकांना तीन रुपयांच्या दरवाढीचा फटका बसणार आहे. वाहनांसाठी वापराला जाणारा सीएनजी आणि घरगुती पाईप गॅसची दररोज ७ लाख किलोची विक्री होते. दिवसेंदिवस या विक्रीमध्ये वाढच नोंदविली जात आहे.

सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरामध्ये प्रतिकिलो तीन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ही वाढ लागू होणार आहे. सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरामध्ये केंद्र शासनाकडून १० टक्क्य़ांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दरवाढ करावी लागतेच आहे.

– संतोष सोनटक्के, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, वाणिज्य व्यवस्थापक.