मंदिरे बंद असल्याने श्रीफळ विक्रीवर परिणाम

पुणे : नवरात्रोत्सवात दरवर्षी भाविकांकडून श्रीफळांचे तोरण अर्पण केले जाते. यंदाच्या वर्षी करोनाच्या  संसर्गामुळे मंदिरे बंद आहेत तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्याऱ्या मंडळांना नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सवात असणाऱ्या श्रीफळांच्या मागणीत मोठी घट झाली आहे तसेच उलाढालही निम्म्यावर आली आहे.

दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यात नारळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. मुसळधार पावसामुळे नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. नारळाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नारळाची आवक कमी झाल्याने दरात शेकडय़ामागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती दी पूना र्मचट्स चेंबरचे माजी अध्यक्ष आणि मार्केट यार्डातील नारळांचे व्यापारी दीपक बोरा यांनी दिली. मार्च महिन्यापासून करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर नारळाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. उपाहारगृहे, खाणावळी बंद होत्या तसेच गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. देवस्थाने, मंदिरे बंद आहेत. त्यामुळे नारळाची मागणी पन्नास टक्क्य़ांनी घटली आहे, असे निरीक्षण बोरा यांनी नोंदविले.

नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला नारळाला मागणी होती. घटस्थापना घरोघरी केली जाते. त्यामुळे नारळाला मागणी होती. दसऱ्यापर्यंत काही प्रमाणात नारळाला मागणी राहील. त्यानंतर नारळाच्या मागणीत आणखी घट होईल तसेच दरही कमी होतील. किरकोळ बाजारात एका नारळाची विक्री २५ ते ३५ रुपये दराने केली जात आहे. असे त्यांनी सांगितले.

यंदा ८ ते १० लाख नारळांची विक्री

दरवर्षी नवरात्रोत्सवात पुणे शहरात १२ ते १५ लाख नारळांची विक्री होते. यंदा उत्सवाच्या कालावधीत ८ ते १० लाख नारळांची विक्री होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी नारळ उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. नारळाचा नवीन हंगाम जानेवारी महिन्यात संक्रांतीनंतर सुरू होईल. त्यानंतर नारळांचे दर कमी होतील. महाराष्ट्रात नवरात्रोत्सवात नारळाला मोठी मागणी असते. देवस्थानच्या परिसरात नारळ विक्री मोठय़ा प्रमाणावर होते, असे मार्केट यार्डातील नारळाचे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.