16 February 2019

News Flash

श्रीफळाच्या मागणीत पाचपटीने वाढ!

सणासुदीच्या काळात नारळाला मागणी असते. भाविकांकडून उत्सवाच्या काळात नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अर्पण करण्याची प्रथा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून नारळांची आवक

भाविकांकडून गणेशोत्सवात श्रीफलाचे तोरण अर्पण केले जाते. प्रसादासाठी केल्या जाणाऱ्या मोदकांसाठी तसेच हॉटेल व्यावसायिकांकडूनही सध्या नारळाला मागणी वाढली असून, गणेशोत्सवात नारळाच्या मागणीत पाचपटीने वाढ झाली आहे. पुणे शहरातील गुलटेकडी मार्केट यार्डमधील भुसार बाजारात कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातून नारळाची मोठी आवक होत आहे. यंदा नारळाचे उत्पादन चांगले झाल्याने दर स्थिर आहेत.

आषाढ, श्रावण, भाद्रपद या महिन्यांत नारळांना मोठी मागणी असते. गुलटेकडी मार्केट यार्डमधील घाऊक भुसार बाजारात आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातून नारळाची आवक होते. यंदा नारळाचे उत्पादन चांगले झाल्याने दरात वाढ झालेली नाही. उत्सवाच्या कालावधीत नारळांच्या मागणीत नेहमीच्या मागणीत चार ते पाचपटीने वाढ होते, असे घाऊक बाजारातील नारळाचे प्रमुख विक्रेते दीपक बोरा यांनी सांगितले.

सणासुदीच्या काळात नारळाला मागणी असते. भाविकांकडून उत्सवाच्या काळात नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण अर्पण करण्याची प्रथा आहे. पुण्यातील श्री दगडूशेठ हलवाई गणपतीस तोरण अर्पण करण्यासाठी भाविक गर्दी करतात. तोरण अर्पण करण्यासाठी नवा नारळ वापरला जातो. तामिळनाडूतून नव्या नारळाची आवक होते. त्यामुळे तोरण विक्रेत्यांकडून उत्सवाच्या कालावधीत नव्या नारळाला मोठी मागणी असते. पुणे शहरात अनेक मंदिरे आहेत. तेथे वर्षभर गर्दी असते. त्यामुळे वर्षभर मंदिराबाहेर बसणाऱ्या नारळ विक्रेत्यांकडून चांगली मागणी असते. नवा नारळ आकाराने लहान असतो. कर्नाटक नारळ आकाराने मोठा व जाड असतो. या नारळाचे खोबरे चवीला गोड असते. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, खानावळचालकांकडून या नारळांना मोठी मागणी असते.

हॉटेल व्यावसायिकांची वाढती मागणी

गणेशोत्सवात बाहेरगावाहून मोठय़ा संख्येने भाविक पुण्यात येतात. हॉटेल व्यावसायिक तसेच रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांकडून नारळाला मोठी मागणी असते. गेल्या काही वर्षांपासून शहरात उकडीचे मोदक घरी तयार करून त्याची बाजारात विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उत्सवाच्या अशा व्यावसायिकांकडून तसेच केटरिंग व्यावसायिकांकडून नारळाला मोठी मागणी राहते. नारळाच्या मागणीत वाढ झाली असली तरी बाजारात नारळांचा तुटवडा नाही. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत अठरा ते पस्तीस रुपयांच्या दरम्यान आहे.

घाऊक बाजारातील शेकडा नारळाचे भाव

* मद्रास नारळ-  २५०० ते २७०० रुपये

*  नवा नारळ- १२०० ते १३००

*  आंध्र प्रदेश पालकोल- १४०० ते १६००

* कर्नाटक सापसोल- १६०० ते २२००

First Published on September 15, 2018 3:10 am

Web Title: coconut demand increased in ganesh festival