गोटा खोबरे, खोबरेल तेलाचे दरही वाढले; दरात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ

नारळाच्या उत्पादनात घट झाल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात नारळाच्या दरात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. नारळाच्या दरात वाढ झाल्यामुळे गोटा खोबरे, खोबरेल तेल, खोबरा किस अशा उपउत्पादनांच्या दरात वाढ झाली आहे. नारळाचे दर आणखी दोन ते तीन महिने तेजीत राहणार आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्डमधील घाऊक भुसार बाजारात आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकातून नारळाची आवक होते. गेल्या वर्षी दक्षिणेकडील राज्यात नारळाचे उत्पादन कमी झाले होते. नारळाचा हंगाम शिवरात्रीनंतर सुरू होतो, मात्र यंदा नारळाचा हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे यंदा नारळाच्या भावात चाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात नारळाचे दर तेजीत आहेत. नारळाच्या दरात वाढ झाल्यामुळे साहजिकच गोटा खोबरे, खोबरेल तेल, खोबरा किस अशा उपउत्पादनांच्या दरात वाढ झाली असल्याचे घाऊक बाजारातील नारळाचे प्रमुख विक्रेते दीपक बोरा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

गेल्या दोन महिन्यांत खोबरेल तेलाच्या दरात किलोमागे पन्नास ते साठ रुपयांनी वाढ झाली आहे. दक्षिणेकडील राज्यातून बाजारात होणारी नारळाची आवक कमी झाली आहे. बाजारात नवीन नारळाचा तुटवडा जाणवत आहे. नारळाच्या नवीन उत्पादनास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी नारळाचे दर तेजीत राहणार आहेत, असे बोरा यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात एक नारळ वीस ते पंचवीस रुपयांना

किरकोळ बाजारात बारा ते पंधरा  रुपये दराने विक्री होत असलेल्या नव्या नारळाच्या एका नगाचा दर वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हॉटेल व्यावसायिक, खाणावळचालकांकडून या नारळांना मोठी मागणी आहे.  मद्रास नारळाच्या एक नगाचा दर अठ्ठावीस ते तीस रुपयांना आहे. मार्च महिन्यात हनुमानजयंती, रामनवमी, गुढीपाडवा हे सण आहेत. त्यामुळे नारळाच्या मागणीत आणखी वाढ होईल. नारळाची आवक जोमात सुरू होण्यासाठी आणखी दोन ते तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे नारळाचे दर तेजीत राहणार आहेत. आंध्र प्रदेशातून पालकोल जातीच्या नारळांची आवक होते. कर्नाटकातून मद्रास नारळाची आवक होते. चैत्र महिन्यात गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू होतो. यात्रा, सणवाराच्या काळात नारळाच्या मागणीत तिपटीने वाढ होते.

शेकडा नारळाचे दर   (जानेवारी, फेब्रुवारी २०१७)

नारळ                                               दर                        

आंध्र प्रदेश पालकोल                         १४०० ते १४५०

नवीन नारळ                                       १३०० ते १३५०

मद्रास नारळ                                २३०० ते २४००

शेकडा नारळाचे दर                   (जानेवारी, फेब्रुवारी २०१८)

नारळ                                                     दर                        

आंध्र प्रदेश पालकोल                            २००० ते २१००

नवीन नारळ                                       १६०० ते १६५०

मद्रास नारळ                                       ३३०० ते ३५००