‘अरे आव्वाज कुणाचा’, ‘थ्री चिअर्स फॉर हिप हिप हुर्रे’ अशा घोषणांच्या निनादात आणि तरुणाईच्या सळसळत्या जल्लोषात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘पेन किलर’ या एकांकिकेने पुरुषोत्तम महाकरंडकावर आपले नाव कोरले. प्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित पुरुषोत्तम महाअंतिम फेरीमध्ये २० संघांचा सहभाग होता. ‘पीआयसीटी’च्या संघाने सादर केलेल्या ‘सरहद’ एकांकिकेने द्वितीय क्रमांक आणि नागपूर येथील डॉ. विठ्ठल खोब्रागडे महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘विश्वनटी’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकाविला. ठाणे येथील  जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘ती आणि आपण’ या एकांकिकेने प्रायोगिक करंडक पटकाविला. प्रदीप वैद्य, ज्योती सुभाष आणि डॉ. प्रवीण भोळे यांनी महाअंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याचे श्रेय पुरुषोत्तम करंडक स्पर्धेलाच जाते, अशी भावना उपेंद्र लिमये यांनी व्यक्त केली. परीक्षकांच्यावतीने प्रदीप वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : वैयक्तिक अभिनय – स्नेहलता तागडे, महंमद साकिब शहजान शेख, निकिता ठुबे, हर्षवर्धन लिमये, उत्तेजनार्थ – रावबा गजमल, श्रुती अत्रे, प्रणय पाटील, ऐश्वर्या पाटील, अनुजा माने, लीना तडवी, साबा राऊळ, प्रणव कुलकर्णी, विद्या मोहिले.