28 September 2020

News Flash

नाणी प्राण्यापक्ष्यांची!

पुराण कथांमधील पशूपक्ष्यांपासून खऱ्याखुऱ्या वन्यजीवांपर्यंत आणि डायनोसॉर्सपासून पाळीव कुत्र्यामांजरींपर्यंतचे वैविध्यपूर्ण आकार कोरलेली रंगीबेरंगी नाणी पुणेकरांना पाहता आली..

| February 8, 2014 03:10 am

त्रिकोणी आकाराच्या चांदीच्या नाण्यावर कोरलेली चिम्पांझी माकडाची मादी व तिच्या पिलाची आकृती, ‘ब्लू व्हेल’ माश्याची आकृती कोरलेले निळ्या रंगाच्या स्टीलचे नाणे, नेहमीच्या गोल आकाराऐवजी चक्क लांडग्याच्या चित्राच्या आकारात बनवलेले नाणे, पायांत हत्ती घेऊन उडणाऱ्या दोन तोंडांच्या पक्ष्याचे (गंडभेरुंड) चित्र कोरलेली सोन्याची वजनदार मुद्रा..
पुराण कथांमधील पशूपक्ष्यांपासून खऱ्याखुऱ्या वन्यजीवांपर्यंत आणि डायनोसॉर्सपासून पाळीव कुत्र्यामांजरींपर्यंतचे वैविध्यपूर्ण आकार कोरलेली रंगीबेरंगी नाणी पुणेकरांना पाहता आली.. इला फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी परिषदेत! ही परिषद खास शिकारी पक्ष्यांवर आधारित असल्यामुळे केवळ शिकारी पक्ष्यांच्या आकृती कोरलेल्या नाण्यांचेही प्रदर्शन या ठिकाणी मांडण्यात आले होते. गेली चाळीस वर्षे देशोदेशींची नाणी जमवण्याचा छंद जोपासणारे एस. आर. भट यांच्या संग्रहात ही नाणी आहेत.
भट म्हणाले, ‘‘मी पंचवीस वर्षांपूर्वी प्राण्यापक्ष्यांची नाणी जमवण्यास सुरुवात केली. माझ्या संग्रहातील ९० टक्के नाणी चांदीची आहेत. चांदीवर आकृती कोरणे तुलनेने सोपे जाते, त्यावर वापरलेले रंगही लवकर जात नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी ‘सेव्ह प्लॅनेट अर्थ’ उपक्रमाअंतर्गत प्राण्यापक्ष्यांची नाणी काढण्यासाठी आर्थिक अनुदान देण्याची योजना हाती घेतली होती. विविध प्राण्यापक्ष्यांची नाणी हाताळताना आणि त्यांची साठवणूक करताना प्राण्यापक्ष्यांच्या संवर्धनाबद्दल जनजागृती व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश होता. याअंतर्गत बऱ्याच छोटय़ा देशांनीही अशी नाणी काढली आहेत.’’
विशेष म्हणजे यातील बहुसंख्य नाणी रंगीत आहेत. काँगो देशाची दहा फ्रँकची काकाकुवा आणि टूकन पक्ष्यांची नाणी, चीनची कोंबडा आणि कोंबडीची रंगीत नाणी,  इझल ऑफ मॅन देशाचे ‘अग्ली डकलिंग’चे नाणे, पलाऊ देशाची ३० जलचरांची नाणी, सोमालियाने काढलेली लांडगा, सिंह, म्हैस, अस्वल, मूस या प्राण्यांची त्यांच्याच आकारातील रंगीत नाणी पाहण्यासारखी आहेत. सिएरा लिओन देशाने खास निशाचर प्राण्यापक्ष्यांची नाणी काढली आहेत. या नाण्यांमध्ये रात्रीचा आभास देण्यासाठी काळसर धातू आणि चमचमणाऱ्या कोरीव कामाचा वापर करण्यात आला आहे.
लहान मुलांना नाण्यांविषयी आणि प्राण्यापक्ष्यांविषयी आकर्षण निर्माण व्हावे यासाठी शाळांमध्ये जाऊन नाण्यांची प्रदर्शनेही भरवत असल्याचे भट यांनी सांगितले.
शिकारी पक्ष्यांचीही नाणी –

  • – अल्जेरिया, रशिया, इझल ऑफ मॅन आणि झांबिया या देशांची
  •    वेगवेगळ्या प्रकारच्या ससाण्यांची नाणी
  • – अमेरिकेचे डौलदार गरुडाचे तर बोटस्वानाचे आफ्रिकन गरुडाचे नाणे
  • – उत्तर कोरियाचे गिधाडाचे नाणे
  • – रशियाचे घुबडाचे नाणे
  • – कर्नाटकच्या विजयनगर साम्राज्यातील हत्ती घेऊन
  •    उडणाऱ्या दुतोंडी पक्ष्याची (गंडभेरुंड) ही अस्सल सोन्याची मुद्रा

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:10 am

Web Title: coin s r bhat bloodhound birds
Next Stories
1 तालुक्याच्या ठिकाणी बसून शेतकरी पाहणार कृषी प्रदर्शन!
2 चिमुकल्या विद्यार्थ्यांची रिक्षा ‘भक्कम’ होणार तरी कधी?
3 धमक असल्यास अजितदादांनी लोकसभा लढवावी – कीर्तिकर
Just Now!
X