उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे तीन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील काही दिवस थंडी राहणार आहे. विदर्भात मात्र थंडीसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. त्यातच सध्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. परिणामी थंड वाऱ्यांच्या प्रवाहाची तीव्रता कायम आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. दुसरीकडे देशात पुन्हा पावसाला पोषक स्थितीही निर्माण होत आहे. त्यामुळे देशातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यात विदर्भामध्ये २१, २२ जानेवारीला पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

थंडीभान.. : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील किमान तापमानात गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीय घट नोंदविण्यात येत आहे. कोकण विभागातील मुंबईचे किमान तापमान शनिवारीही सरासरीखाली १५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अलिबाग, रत्नागिरीतही थंडी कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, जळगाव, महाबळेश्वर आदी ठिकाणी थंडीचा कडाका आहे. नाशिक येथे शनिवारी राज्यातील नीचांकी ७.८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. मराठवाडय़ात औरंगाबाद, परभणीतील पारा सरासरीखाली आहे. विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ आदी भागांत गारठा जाणवतो आहे.