पुणे : सर्दी, खोकला, ताप (फ्ल्यू) यासारखी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी महापालिकेच्या कोव्हिड काळजी केंद्रात उपचार घ्यावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

काही नागरिक सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे आढळून आल्यानंतर स्वत: उपचार करून घेत आहेत किंवा स्थानिक खासगी डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत, असे आढळून येत आहे. स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतल्यानंतर दहा दिवसांत या रुग्णामध्ये आजार गंभीर किंवा जीवघेणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फ्ल्यूसारखी लक्षणे दिसत असल्यास महानगरपालिकेच्या फ्ल्यू दवाखान्यात तपासणीसाठी जावे, अशी विनंती करण्यात आली आहे. या दवाखान्यामधील डॉक्टर नागरिकांच्या लक्षणाच्या आधारे आपली करोनासाठी चाचणी करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतील. तर, करोनासाठी चाचणी करायची आवश्यकता असल्यास पुणे शहरात १९ ठिकाणी चाचणीसाठी नमुने घेण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामध्ये डॉ. नायडू रुग्णालय, ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम), जिल्हा रुग्णालय औंध, भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, भोसरी रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, सह्य़ाद्री रुग्णालय कोथरूड यांचा समावेश आहे. खासगी डॉक्टर किंवा रुग्णालयांमध्ये आलेल्या कोणत्याही रुग्णाला फ्ल्यूसारखी लक्षणे दिसल्यास पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या फ्ल्यू रुग्णालयात किंवा कोविड काळजी केंद्रामध्ये नायडू रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, ससून सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय औंध या ठिकाणी पाठवावे, असे आवाहन शहरासह जिल्ह्य़ातील वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यांचे नमुने घेऊन निष्कर्षांनुसार औषधोपचार करता येतील, असेही डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले आहे.