05 December 2020

News Flash

कोकण वगळता राज्यात सर्वत्र गारवा

देशभरात थंडी वाढविणाऱ्या बर्फवृष्टीचे हिमालयात संकेत

(संग्रहित छायाचित्र)

कोकण विभागातील बहुतांश भाग वगळता राज्यात सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत घसरल्याने गारठा वाढला आहे. विदर्भात थंडीच्या लाटेची स्थिती कायम असून, चंद्रपूर येथे सोमवारी राज्यातील नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ातील परभणी येथील पाराही चांगलाच घसरला आहे. मध्य महाराष्ट्रातही सर्वत्र तापमानात घट झाली आहे.

दरम्यान, देशात थंडी वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बर्फवृष्टीला १२ नोव्हेंबरपासून हिमालय विभागात सुरुवात होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात राज्यात कोरडे हवामान राहिल्यास उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह वाढून महाराष्ट्रातही गारठा वाढू शकतो.

राज्यात सर्वत्र निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती आहे. रात्रीही आकाश निरभ्र राहत असलेल्या भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट होत आहे. विदर्भाच्या काही भागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असल्याने या भागांत हंगामाच्या सुरुवातीलाच थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. पाच दिवसांपासून चंद्रपूरचा किमान तापमानाचा पारा नीचांकी पातळीपर्यंत घसरतो आहे. त्यात सोमवारी आणखी घट होऊन तो ८.६ अंश सेल्सिअसवर आला. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ८.८ अंशांनी कमी आहे. मराठवाडय़ातील परभणीचा पाराही झपाटय़ाने खाली गेला असून, या ठिकाणी काही विभागांत ८.८ अंशांपर्यंत पारा खाली गेला. त्यामुळे हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा अनुभव या भागांत येत आहे.

मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, जळगाव आणि सोलापूर या भागातील तापमान सरासरीपेक्षा खाली असून, रात्री आणि पहाटे मोठय़ा प्रमाणावर गारवा जाणवतो आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि बीडमध्येही तापमानात घट आहे. विदर्भातील चंद्रपूरसह इतर भागांतही तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ६ अंशांनी घट झाली आहे. कोकण विभागामध्ये मात्र अद्यापही किमान तापमानाचा पारा सरासरीच्या आसपासच आहे.

किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (२४.५), मुंबई-सांताक्रुझ (२१.०), रत्नागिरी (२३.७), पुणे (१३.६), जळगाव (१२.६), कोल्हापूर (१८.४), महाबळेश्वर (१४.०), मालेगाव (१३.८), नाशिक (१२.५), सांगली (१६.९), सातारा (१५.७), सोलापूर (१४.२), औरंगाबाद (१३.२), परभणी (१०.३), नांदेड (१४.०), अकोला (१३.१), अमरावती (१२.८), बुलढाणा (१४.५), ब्रह्मपुरी (१४.२), चंद्रपूर (८.६), गोंदिया (११.०), नागपूर (१२.५), वाशिम (१३.०), वर्धा (१३.६).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:19 am

Web Title: cold everywhere in the state except konkan abn 97
Next Stories
1 कुलकर्णी यांना डावलून भाजपची देशमुख यांना पुण्यात उमेदवारी
2 पुणे शहरात दिवसभरात १६० नवे करोनाबाधित दहा रुग्णांचा मृत्यू
3 पुण्यात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी
Just Now!
X