पहाटेचे अभ्यंगस्नान आणि त्यानंतर चमचमीत फराळ याला मिळणारी गुलाबी थंडीची जोड दिवाळी साजरी करण्यातील मजा अधिकच वाढवते. यंदा मात्र ही गुलाबी थंडी दिवाळीत अनुभवायला मिळणार का याबाबत मात्र शंकाच आहे. राज्यात अजूनही मान्सून सक्रिय असून पुढील आठवडय़ात राज्यातील मान्सून परतेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दिवाळी पहाट आणि थंडी हे एक समीकरण आहे. ही थंडी कडाक्याची नसली, तरी दिवाळी सुरू झाल्याची जाणीव गुलाबी थंडी करून देते. मात्र गेल्या काही वर्षांत राज्यात मान्सूनचा मुक्काम लांबल्याचे दिसत आहे. त्यामुळे थंडीही लांबली आहे.

यंदा दिवाळी लवकर आहे. त्याचप्रमाणे राज्यात अद्यापही पाऊस सुरू असल्यामुळे अद्याप थंडीची चाहूल लागलेली नाही. सध्याची तापमानाची स्थिती पाहता दिवाळी गुलाबी थंडीविनाच जाणार असल्याची शक्यता आहे.

पावसामुळे सध्या शहरातील कमाल तापमान नेहमीपेक्षा कमी आहे. मात्र किमान तापमानात घट झालेली नाही. गेले काही दिवस किमान तापमानात साधारण २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान चढउतार होत आहे.

पुढील आठवडय़ाच्या सुरुवातीला म्हणजेच १५ ते १७ ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यातील मान्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर हवा कोरडी झाल्यावर किमान तापमानात हळूहळू घट होऊ शकेल. मात्र पुढील तीन-चार दिवस शहरात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सहा-सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीपर्यंत थंडीसाठी पूरक स्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे दिसत आहे.

थंडी येते कशी?

मान्सून परतल्यावर आभाळ स्वच्छ होते आणि त्याबरोबर हवा कोरडी होऊ लागते. कोरडय़ा हवेत तापमान काही प्रमाणात कमी होऊ लागते. ही स्थिती थंडीसाठी पूरक मानली जाते. त्यानंतर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी राज्यातील थंडी वाढते.

‘राज्यातील मान्सून १५ ते १७ तारखेच्या आसपास परतेल असा अंदाज आहे. ढगाळ हवेत किमान तापमानात खूप घट होत नाही. हवा कोरडी होऊ लागली की थंडीबाबत अंदाज व्यक्त करता येऊ शकतो.’

ए. के. श्रीवास्तव, हवामन विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख