सुमारे आठवडाभर राज्यात अवतरलेली थंडी सध्या घटली असून, राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानाचा पारा सरासरीपुढे गेला आहे. हवामान बदलच्या स्थितीमुळे आता अवकाळी हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १८ नोव्हेंबरला दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रातही या काळात काही भागांत पावसाच्या हजेरीची शक्यता आहे.

कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे राज्यात आठवडाभर सर्वच ठिकाणी किमान तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला होता. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, सध्या उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊन रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

दिवाळीनंतर दक्षिण कोकणात पाऊस

* कोकणातील रात्रीचे तापमान सरासरीच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रात त्यात २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भातही बहुतांश ठिकाणी ३ अंशांनी किमान तापमान वाढले आहे.

* मराठवाडय़ातही ३ ते ४ अंशांनी तापमानात वाढ झाली असून, केवळ उस्मानाबाद येथेच किमान तापमान सरासरीखाली असून, तेथे शनिवारी राज्यातील नीचांकी १५.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.

* हवामान विभागाच्या अंदाजानुसार १७ नोव्हेंबपर्यंत राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. १८ नोव्हेंबरला दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.