05 April 2020

News Flash

जानेवारी अखेरपर्यंत थंडीचा मुक्काम

कोकण, उत्तर महाराष्ट्र विदर्भात आज पावसाची शक्यता

कोकण, उत्तर महाराष्ट्र विदर्भात आज पावसाची शक्यता

पुणे : राज्यात दोन दिवसांनंतर पुन्हा कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने जानेवारी अखेरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात थंडी कायम राहणार आहे. दरम्यान, मंगळवारी (२८ जानेवारी) कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून सध्या उष्ण वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाले आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांचा वेग आता कमी होत आहे. त्यातच काही भागात ढगाळ हवामानाची स्थिती निर्माण होत असल्याने थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. केवळ विदर्भात आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने या भागात थंडी जाणवते आहे. विदर्भातील किमान तापमान ११ ते १५ अंशांच्या आसपास आहे. सोमवारी नागपूर येथे राज्यातील सर्वात नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणीतील किमान तापमान सरासरीच्या खाली आहे.

कोकण विभागात मुंबईसह अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. मध्य महाराष्ट्रात अंशत: ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने या भागात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सध्या तरी थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, दोनच दिवसांत पुन्हा निरभ्र आकाशाची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होऊन रात्रीच्या थंडीत काही प्रमाणात वाढ होऊ शकणार आहे.

पाऊस कशामुळे आणि कुठे?

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील पश्चिमी चक्रावात आणि चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे २८ जानेवारीला कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठाणे, नाशिक, पालघर, रायगड, धुळे जिल्ह्यंच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 4:30 am

Web Title: cold season remain till january end zws 70
Next Stories
1 शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत जेवणासाठी मार्केटयार्डात हाणामारी
2 निर्भय व्हा, अन्यथा किंमत चुकवावी लागेल
3 सहा हजार २२९ कोटींचे स्वप्नरंजन
Just Now!
X