उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्याच्या काही भागांत थंडीची लाट पसरली आहे. नागपूर, नाशिक किमान तापमान ६ अंशांच्या खाली गेले. इतरत्रही तापमान सरासरीच्या कितीतरी खाली गेले आहे.
या थंडीचा परिणाम रब्बीच्या हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांवर चांगला होईल, असे कृषी विभागाच्या विस्तार विभागाचे संचालक के. व्ही. देशमुख यांनी सांगितले. मात्र, त्याच वेळी द्राक्षासारख्या फळपिकांवर काही प्रमाणात विपरीत परिणाम होऊ शकतो. थंडीमुळे शेतीप्रमाणेच शहरांमधील जनजीवनावरही परिणाम झाले आहेत. पुण्यासारख्या शहरांमध्ये एरवी रात्री उशिरापर्यंत वाहतूक कायम असते. सध्या मात्र रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी झालेली दिसत आहे. त्याचप्रमाणे उबदार कपडय़ांची विक्री वाढली आहे.

विविध ठिकाणचे तापमान
कोकण : मुंबई (कुलाबा) २०, सांताक्रुझ १४.२, अलिबाग १७, रत्नागिरी १७.२, डहाणू १५.२, भीरा १६.५
मध्य महाराष्ट्र : पुणे ७.४, सातारा ८.१, सांगली ११.९, कोल्हापूर १४.२, सोलापूर १०, महाबळेश्वर १०.४, मालेगाव ८.४, नाशिक ५.८
मराठवाडा : उस्मानाबाद १०.२, औरंगाबाद ७.९, परभणी ९.४, नांदेड ७
विदर्भ : बुलडाणा १०, अकोला ८.५, अमरावती १०.२, ब्रह्मपुरी ९.९, नागपूर ५.३, वाशिम १३, वर्धा ८, यवतमाळ ८.४

नागपुरात दशकभरातील थंड दिवस
अवकाळी पावसानंतर राज्यात तापमानाचा पारा कमी आणि थंडीचा पारा वाढतच आहे. गेल्या दहा वर्षांतील जानेवारीतील सर्वाधिक थंड दिवस म्हणून १० जानेवारी २०१५ ची नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा ६.२ वरून अवघ्या २४ तासात ५.३ अंशावर घसरला आणि नागपूरकरांना या कडाक्याच्या थंडीने घराबाहेर पडणेही मुश्कील केले. थंडीची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहील, असा अंदाज नागपूर वेधशाळेने व्यक्त केला आहे.