धनकवडी परिसरात महापालिकेने स्वच्छ संस्थेच्या सहकार्याने सुरू केलेल्या ई-वेस्ट केंद्रात वर्षभरात एक हजार किलो कचरा संकलित करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता असलेले हे शहरातील हे एकमेव ई-वेस्ट संकलन केंद्र आहे.

महापालिकेच्या वतीने धनकवडी परिसरातील लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय संकुलात या केंद्राची गेल्या वर्षी उभारणी करण्यात आली. वर्षपूर्ती निमित्त खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ई-वेस्ट संदर्भात जनजागृती आवश्यक आहे. ई-वेस्ट या प्रकारच्या कचऱ्याचे संकलन होत असल्यामुळे कचरा भूमीवरील ताण कमी होत आहे. त्यामुळे अशी केंद्रे उभारणे आवश्यक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. स्वच्छ संस्थेच्या अध्यक्षा सुमन मोरे म्हणाल्या, की कचरा वेचकांकडून पर्यावरण रक्षणाचे काम करण्यात येत आहे. त्यांच्या सहकार्याने आणि प्रयत्नातूनच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे.