येत्या काही दिवसांत महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या निवडणुकीमुळे विद्यार्थी संघटनांनी सदस्य नोंदणी अभियानापासून विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटना ‘सक्रिय’ झाल्याचे चित्र आहे.

राज्यात बऱ्याच वर्षांनंतर महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जाणार आहेत. या अंतर्गत महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार या निवडणुकीत विद्यार्थी संघटना, राजकीय पक्षांना सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीसाठी उभे राहणारे विद्यार्थी उमेदवार हे विद्यार्थी संघटना किंवा राजकीय पक्षांची पाश्र्वभूमी असण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गेल्यावर्षी सेल्फी विथ कॅम्पस युनिट हे अभियान राबवले होते. हेच अभियान पुन्हा राबवण्यात येत आहे. प्रत्येक महाविद्यालयात शाखा सुरू करण्याचे अभाविपचे उद्दिष्ट असल्याची माहिती पुणे महानगर कार्यालयमंत्री पूर्वा भवाळकर यांनी दिली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून विद्यापीठासह महाविद्यालयांमध्ये कॉफी विथ स्टुडंट्स हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याला प्राधान्य आहे. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसशी जोडून घेण्याचा प्रयत्न आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष ऋषी परदेशी यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे पुढील काही दिवसांत विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधनासाठी पथनाटय़ आणि सदस्यनोंदणी मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली. विद्यापीठातील विभागांमध्ये, महाविद्यालयांमध्ये समन्वयक नोंदणी, सदस्य नोंदणी, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेणे, विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सतीश गोरे यांनी स्पष्ट केले.