ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीने अध्यापन प्रक्रिया

पुणे : राज्य शासनाच्या निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत पुणे महापालिकेनेही परवानगी दिली असून, महाविद्यालय प्रत्यक्ष पद्धतीने सुरू करण्यासाठी महाविद्यालयांकडूनही आवश्यक तयारी करण्यात आली आहे. मर्यादित संख्येनेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश द्यायचा असल्याने ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अध्यापन प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. अंतिम वर्षांच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच झाल्या. शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन महापालिकेने ५ जानेवारीपासून वर्ग सुरू के ले. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्थानिक प्राधिकरणाची मान्यता घेऊन १५ फेब्रुवारीपासून वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले. महापालिकेने महाविद्यालये सुरू करण्यास बुधवारी परिपत्रकाद्वारे मान्यता दिली. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून शहरातील पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह अभियांत्रिकी, वास्तुकला आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होतील.

एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश राऊत म्हणाले, की महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे नक्कीच स्वागत आहे. महाविद्यालय सुरू करताना शासनाच्या नियमाप्रमाणे करोना प्रतिबंधासाठी इमारत, वर्गाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण द्राव, शरीराचे तापमान मोजणे, अंतर राखून वर्गातील बैठक व्यवस्था आदी सर्व तयारी केलेली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयात विद्यार्थी मर्यादित संख्येने येऊ शकतील. ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेले विद्यार्थी आता प्रत्यक्ष महाविद्यालयात येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी-शिक्षक यांच्यात प्रत्यक्ष संवाद सुरू होईल. या अभूतपूर्व संकटावर मात करताना अनेक त्रुटींचा प्रथमच सामना करावा लागणार आहे. अशावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक,  प्राध्यापक यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. ‘करोना प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक ती सर्व तयारी केलेली आहे. विद्यार्थी मर्यादित संख्येने महाविद्यालयात येऊ शकतील. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवणे, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके पूर्ण करून घेण्याला प्राधान्य दिले जाईल,‘ असे मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी सांगितले.

बी. एन. सी. ए. वास्तुकला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले, की मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाविद्यालय सुरू करण्यासाठीची तयारी करण्यात आली आहे. मर्यादित संख्येने महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याने ऑनलाइन-ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल. हे काम आव्हानात्मक आहे.

वसतिगृह सुरू होण्याची प्रतीक्षा

पुणे आणि परिसरातील महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा टक्का आहे. करोना काळात अनेक विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. महाविद्यालये सुरू होत असली, तरी वसतिगृहे सुरू करण्यास अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे वसतिगृह सुरू झाल्याशिवाय बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना परत येणे शक्य नाही. त्यामुळे वसतिगृहे सुरू होण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.