महाविद्यालयांचे संलग्नीकरण, परीक्षा शुल्क हे विद्यापीठाचे मुख्य उत्पन्न! मात्र, विद्यापीठाचे उत्पन्न महाविद्यालयांसाठी वापरण्याऐवजी वेगवेगळ्या योजनांसाठी महाविद्यालयाकडूनच अतिरिक्त शुल्क विद्यापीठाने आकारण्यास सुरुवात केली असून आता शिक्षक मान्यतेसाठीही महाविद्यालयांनाच शुल्क द्यावे लागणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मुख्य उत्पन्न हे महाविद्यालयांकडून संलग्नीकरण आणि इतर कामांसाठी घेतले जाणारे शुल्क आणि परीक्षा शुल्क आहे. मात्र, महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या निधीचा उपयोग महाविद्यालयांसाठी करण्याऐवजी त्यांच्याकडूनच वेगवेगळ्या मार्गाने विद्यापीठ पैसे घेत असल्याची तक्रार महाविद्यालयांनी केली आहे. यापुढे शिक्षक मान्यतेसाठीही महाविद्यालयांनाच शुल्क आकारण्यात येणार आहे. शिक्षक मान्यतेच्या प्रत्येक प्रस्तावासाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. १ नोव्हेंबरपासून हे शुल्क लागू होणार आहे. शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव यापुढे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. त्यासाठी हे शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
यापूर्वीही परीक्षेची बहुतेक कामे विद्यापीठाने महाविद्यालयांवरच सोपवली आहेत. उत्तरपत्रिकांच्या प्रती काढणे, प्रवेशपत्रे छापणे या कामांचा भरूदडही महाविद्यालयांवरच पडत आहे. विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणाऱ्या क्रीडा शुल्कातील काही रक्कम ही विद्यापीठाला द्यावी लागते. मात्र, विद्यापीठाकडून महाविद्यालयांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यातच आता मान्यतेसाठीही शुल्क आकारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.