न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे घेण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी होण्यापूर्वीच महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने घेतला असून प्रवेश प्रक्रिया शेवटपर्यंत ऑनलाइन पद्धतीनेच होईल, असे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी सांगितले. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही एक दिवसाने पुढे सरकले आहे.
अकरावी प्रवेशाच्या तीन फे ऱ्या झाल्यानंतर उरलेल्या प्रवेशांसाठी चौथी फेरी घेण्याची सूचना उच्च न्यायालयाने केली होती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबून अकरावीचे वर्ग उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, महाविद्यालये नियोजित वेळापत्रकानुसार म्हणजे १५ जुलैलाच सुरू करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी ही महाविद्यालये सुरू झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे. महाविद्यालये सुरू झाली तरीही चौथी फेरी ही लगेच राबवण्यात येणार आहे. त्यामुळे महिनाभराच्या आत विद्यार्थी वर्गामध्ये बसू शकतील. प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरीही ऑनलाइनच होणार आहे. अगदी शेवटच्या विद्यार्थ्यांलाही ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेश देण्यात येईल, असे प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे.
या वर्षीपासून दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही ऑगस्टमध्ये अकरावीला प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेशही केंद्रीय प्रवेस समितीकडून ऑनलाइन करण्यात येणार असून त्यासाठीही स्वतंत्र प्रवेश फेरी राबवण्यात येणार आहे.
अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
अकरावी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी एक दिवस मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना शुक्रवार (१९ जून) सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरल्यानंतर तो निश्चित करण्यासाठी ‘कन्फर्म’ बटनावर क्लिक करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आल्यामुळे आता सगळेच वेळापत्रक एकेका दिवसाने पुढे सरकले आहे. त्यामुळे आता २४ ऐवजी २५ जूनला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

अल्पसंख्याक संस्थांच्या मनमानीवर नियंत्रण नाहीच!
अल्पसंख्याक महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश देण्याच्या सूचना शासनाने देऊनही अनेक संस्थांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन न करता विद्यार्थ्यांची डेटा एन्ट्री करून ती ऑनलाइन असल्याचे भासवण्यात येत असल्याची तक्रार पालकांची आहे. शिक्षण विभागाला या संस्था नेमक्या काय करताहेत याची कल्पनाच नाही. तक्रार कोणाकडे करायची याबाबतही पालक अनभिज्ञच आहेत. त्यामुळे संस्थांचे फावले आहे. अनेक संस्थांनी गुणपत्रक मिळण्यापूर्वीच प्रवेश यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशही देऊन टाकल्याचे समोर येत आहे. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश न करणाऱ्या अल्पसंख्याक संस्थांचे प्रवेश बेकायदा ठरवण्यात येतील, असे जाधव यांनी सांगितले.
अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत आलेले अर्ज
अकरावीसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी अर्जाचे दोन्ही भाग भरून अर्ज निश्चित केले आहेत. ७५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी लॉग इन केले आहे, त्यातील ७० हजार ३६४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा फक्त पहिला भाग भरला आहे.