बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक असेल किंवा लोकसभा, विधानसभेची निवडणूक असेल यामध्येही त्यांनी आपलं नशीब आजमावलं होतं. परंतु आता त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिजित बिचुकले यांनी शनिवारी पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. “चाहतावर्ग मला कायमच पाठिंबा देत असतो. परंतु पैसा आणि सत्तेच्या ताकदीसमोर माझी चिकाटी कमी पडते. त्यामुळेच आपला पराभव होत आला आहे. परंतु पदवीधरच्या निवडणुकीत मतदारांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मी शिक्षण आणि नोकऱ्यांना प्राधान्य देणार आहे. मला एकदा संधी देऊन पाहावी,” असं बिचुकले यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. तर विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून आव्हान दिलं होतं. परंतु त्यातही त्यांना यश मिळालं नव्हतं. इतकंच नाही तर बिचुकले यांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. याव्यतिरिक्त राष्ट्रपतीपदाच्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्येही बिचुकले यांनी आपलं नशीब आजमावलं होतं.

मनसेकडून रूपाली पाटील-ठोंबरे रिंगणात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तयारी सुरू केली असू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रूपाली पाटील-ठोंबरे यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्या मनसेच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत.