किरकोळ वादावादीतून एखाद्याचा बळी जातो.. एखाद्या घटनेत कु टुंबातील कमावती व्यक्ती मृत्युमुखी पडल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघडय़ावर पडते.. अशा कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी (व्हिक्टीम कॉम्पोनसेशन स्कीम) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सहा कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख दोन हजार रुपयांची मदत देण्यात आली. या योजनेत बारा लाख २७ हजार रुपयांची मदत देण्यात आल्यामुळे गंभीर गुन्ह्य़ात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
खून झालेल्या प्रत्येक व्यक्तीची पाश्र्वभूमी गुन्हेगारी नसते. अनेकदा किरकोळ वादविवादाचे पर्यवसान एखाद्याच्या खुनात होते किंवा हाणामारीत एखादी व्यक्ती जखमी होते. खून, मारामारी, बलात्कार पीडित महिला अशांना नुकसान भरपाई देण्याची योजना राज्य शासनाने सन २०१४ मध्ये कुटुंबीयांना साहाय्य करण्याची योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत खून झालेल्या व्यक्तीच्या कु टुंबीयांना दोन लाख रुपये आणि अंत्यसंस्काराच्या खर्चापोटी दोन हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ही नुकसान भरपाई देण्यात येते. त्यासाठी अर्ज केल्यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाला आहे तेथून माहिती मागविण्यात येते. पोलिसांच्या माध्यमातून शहानिशा करण्यात आल्यानंतर नुकसान भरपाईचा दावा मार्गी लावण्याची प्रक्रिया पार पडते.
साधारणपणे गंभीर गुन्हा घडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो. यंदा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाक डे सोळा अर्ज आले होते. त्यापैकी अकरा अर्जदारांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. नुकसान भरपाई निधी वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुमंत कोल्हे, सचिव महेश जाधव, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वाय.जी. शिंदे, सचिव अॅड. सत्यजित तुपे, अॅड. अनिल गुंजाळ आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

मुलगा सजावटीचे काम करायचा. तो वडिलांना घर चालविण्यासाठी मदत करायचा. चोविसाव्या वर्षी हाताशी आलेल्या मुलाचा वादातून खून झाला. तो गेल्यानंतर आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. सध्या आम्ही भाडय़ाच्या घरात राहायला आहोत. शासनाने दिलेल्या मदतीमुळे आमच्या वेदनांवर कोणीतरी फुंकर घातली असे वाटले. मदतीमुळे आम्हाला थोडा दिलासा देखील मिळाला आहे.
– सुमन कंधारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comfort received violence legal services
First published on: 19-03-2016 at 03:34 IST