शहराच्या महत्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी महापालिकामध्ये सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येते. मात्र, आयुक्त आणि महापौर परदेश दौऱ्यावर असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची आजची सर्वसाधरण सभा २८ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. महापौर आणि आयुक्त यांच्या परदेशी दौऱ्याच्या कालावधीत उपमहापौर शैलजा मोरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

शहरातील महत्वाचे प्रश्न ऐरणीवर असताना महापौर आणि आयुक्तांनी सर्वसाधारण सभेच्यावेळी परदेश दौरा आखल्याने विरोधकांनी त्यांचा निषेध केला.  शहरातील कचरा प्रश्न , डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव, विविध विकास कामातील अडथळे याकडे दुर्लक्ष करत महापौर आणि आयुक्त परदेश दौऱ्यावर गेले आहेत. अशी टीका शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली. याशिवाय परदेशी दौऱ्याचा खर्च स्वत:च्या खिशातून करा, नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करु नका, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज होती. सर्वसाधारण सभेच्या पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर शैलजा मोरे यांना संधी मिळाली. त्याला नगरसवेक नामदेव ढाके यांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादीच्या काळात माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल यांच्या कार्यकाळात एकदाही उपमहापौरांना पीठासीन अधिकारी म्हणून बसण्याची संधी मिळाली नाही. पण, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या काळात पहिल्या सहा महिन्यातच उपमहापौर शैलजा मोरे याना पीठासीन अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली.