आयुक्तांकडून स्वच्छतेच्या कामाचा पाहणीदौरा
नालेसफाई आणि स्वच्छतेच्या कामांसाठी म्हणून पिंपरी पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शहराचा पाहणी दौरा सुरू केला असला तरी या दौऱ्यात त्यांनी अनेक छोटय़ा-मोठय़ा गोष्टींचीही सखोल माहिती घेतली आहे. त्यामुळे त्यांना ठेकेदारांची लबाडी, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, अधिकाऱ्यांचे उद्योग अशा अनेक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. निवडणुका तोंडावर असल्याने आयुक्तांच्या या दौऱ्यात ‘चमकोगिरी’ करण्याची संधी नगरसेवकांनी सोडलेली नाही.
शहराची सखोल माहिती व्हावी म्हणून रुजू झाल्यानंतर यापूर्वीचे आयुक्त राजीव जाधव यांनीही पाहणी दौरा केला होता, त्याचा पुढे त्यांना बराच उपयोग झाला. नव्याने रुजू झालेल्या वाघमारे यांनीही नालेसफाईच्या निमित्ताने शहरदौरा सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भल्या सकाळी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह पाहणीसाठी बाहेर पडत आहेत. आतापर्यंत त्यांनी शहरातील बऱ्यापैकी भाग पिंजून काढला आहे. नाल्यांची सफाई व स्वच्छतेच्या कामांची पाहणी त्यांनी प्राधान्याने केली. त्याशिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृहांची तसेच शौचालयांची ते पाहणी करत आहेत. करसंकलन कार्यालये, भाजीमंडई, वाचनालये, स्पर्धा परीक्षा केंद्रे अशा अनेक ठिकाणी आयुक्तांनी अचानक जाऊन तपासणी केली. कर्मचाऱ्यांच्या कामावर येण्या-जाण्याच्या वेळा तपासल्या. ठेकेदारांकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो, तो वेळेवर मिळतो का, असे प्रश्न खुद्द आयुक्तांनीच विचारले. चिंचवडचे चापेकर स्मारक असो, की मोरया मंदिर परिसर, यासारख्या महत्त्वाच्या विषयांची माहिती त्यांनी घेतली. चुकीच्या गोष्टी आढळून आल्यास कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले आहेत. या दौऱ्याची माहिती आयुक्त स्वत:हून नगरसेवकांना देत नाहीत. मात्र, आयुक्त आपल्या प्रभागात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक नगरसेवक या दौऱ्यात सहभागी होत आहेत. आपणच त्यांना प्रभागात आणले, या थाटात दौऱ्यात फिरून ‘चमकोगिरी’ करताना अनेक नगरसेवक दिसत होते.