भाजीपाल्याच्या गाडय़ा अडवल्यामुळे शहरात तुटवडा

पुणे: मार्केटयार्डातील आडते संघटना, व्यापाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर येत्या काही दिवसांत शहरात फळभाज्यांचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मार्केटयार्डातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामगार संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्याने बाजारात येणारा शेतीमाल उतरावयाचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच पुणे शहरात येणाऱ्या फळभाज्यांच्या गाडय़ा पोलिसांकडून जिल्ह्य़ातील सीमेवर अडवण्यात आल्याने यापुढील काळात सामान्यांना या बंदची तीव्र झळ बसणार आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील आडते, व्यापारी तसेच कामगार संघटनेकडून करोनामुळे ३१ मार्चपर्यंत व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय करण्यात आला असून बुधवारपासून (२५ मार्च) बंद सुरू झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बाजार घटकांनी बंद पाळू नये, असे आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे सामान्यांना झळ बसणार आहे. शहरात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे बाजार आवारातील कामगार, हमाल भयभीत झाले असून सद्य:स्थितीत अनेकजण घरीच बसून आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शेतीमालाची चढउतार करण्यास कामगार, हमाल उपलब्ध नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

संपूर्ण देशात संचारबंदी तसेच दैनंदिन व्यवहारांवर निर्बंधआणण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर पुण्यात शेतीमाल विक्रीस घेऊन येणाऱ्या गाडय़ा जिल्ह्य़ातील सीमांवर पोलिसांकडून अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत बाजारात शेतीमाल घेऊन येणाऱ्या गाडय़ा दाखल झाल्या नाहीत. शहरातील किरकोळ व्यापारी शेतक ऱ्यांकडून थेट शेतीमाल खरेदी करू शकतात. मात्र, जिल्हाबंदीमुळे शेतीमाल बाजारात उपलब्ध झाला नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे, अशी माहिती शेतक ऱ्यांकडून देण्यात आली.\

पोलिसांचा मार, शेतीमालाचे नुकसान

करोनामुळे संपूर्ण राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या गाडय़ा अडवू नका, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असतानाच पोलिसांकडून जिल्ह्य़ात येणारे मार्ग रोखण्यात आले आहेत. सातारा, पुरंदर, मंचर, आंबेगाव परिसरातून येणारा शेतीमाल घेऊन येणाऱ्या गाडय़ा परत पाठविण्यात आल्या आहेत. पोलिसांचा मार खाण्यापेक्षा घरी बसलेले बरे, असे शेतक ऱ्यांनी सांगितले. शेतीमाल नाशवंत आहे. शहरात विक्रीसाठी पाठविण्यात आलेला शेतीमाल परत घेऊन जाणे परवडणारे नाही. शेतीमाल नाशवंत असून गाडय़ा अडविण्यात आल्यामुळे शेतीमाल फेकून देण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही.

मार्केटयार्डातील बाजार बंद आहे. सद्या बाजारात उपलब्ध असलेल्या भाजीपाल्याची साठवणूक करण्यात आलेली आहे.भाजीपाल्याचा तुटवडा जाणवणार असून शहर आणि उपनगर परिसरात किरकोळ व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव चढय़ा भावाने विक्री करावी लागत आहे. भाजीपाला मुबलक उपलब्ध झाल्यास भाववाढीचा प्रश्न येत नाही. मार्केटयार्डात खरेदीसाठी येणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

– प्रकाश ढमढेरे, किरकोळ बाजारातील भाजीपाला विक्रेते