दैनंदिन व्यवहारात भाषेचा नित्य वापर, सोप्या शब्दांना प्रमाण भाषेत आणून ज्ञानभाषा म्हणून विकसित करणे आणि संगणक क्रांतीमध्ये मराठीला स्थान प्राप्त करून देण्यासाठी दबाव आणणे, अशा विविध माध्यमांद्वारे भाषा जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल) व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी रविवारी व्यक्त केले.
भाषा फाउंडेशनतर्फे आयोजित कथायात्रा महोत्सवात ‘भाषा : जतन आणि तंत्रज्ञान’ या विषयावर विवेक सावंत यांनी संवाद साधला. भोपाळ येथील लिटल बॅले ट्रुपने सादर केलेल्या ‘रामायण’ या बाहुलीनाटय़ सादरीकरणाने महोत्सवाची सांगता झाली.
विवेक सावंत म्हणाले,‘‘प्रत्येकाच्या मेंदूमध्ये आकलन आणि अभिव्यक्ती ही भाषिक बुद्धिमत्तेची दोन केंदं्र असतात. भाषा जेवढी वापरू तेवढे हे केंद्र विकसित होते. जगण्याच्या झगडय़ातून भाषा विकसित होते. हा झगडा सुरूच असल्याने भाषाही सातत्याने विकसित होण्यास वाव असतो. संगणक क्रांतीच्या माध्यमातून कोरियन, अरेबिक भाषा जतनासाठी होतात तसे प्रयत्न मराठी भाषेच्या जतनासाठी होत नाहीत. तंत्रज्ञानाने सर्व गोष्टी दिल्या तरी प्रश्न आपल्या मानसिकतेचा आहे. मराठीमध्ये तंत्रज्ञान उत्कृष्टपणे शिकविता येते हे एमकेसीएलने सिद्ध केले. भाषा केवळ करमणुकीची राहून तिचे जतन होणार नाही. कर्तबगार लोकांनी व्यवहारामध्ये मराठीचा वापर केला पाहिजे.’’
बोलण्याचे संहितेमध्ये रुपांतर करणारे (स्पीच टू टेक्स्ट) अॅप गुगलने विकसित केले आहे. ४० कोटींची बाजारपेठ असल्याने हिंदूीमध्ये हे अॅप आहे. पण, हे मराठीमध्ये येईल असा दणका गुगलला दिला पाहिजे. त्याचबरोबरीने एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेत व्यक्त करणारे, स्वत: शिकत राहणारे आणि सुधारत राहणारे (ऑनटाईम रनटाईम ट्रान्स्लेशन) सॉफ्टवेअर विकसित करण्याचे संशोधन प्रगत टप्प्यावर आहे. त्यामुळे केवळ मराठी भाषा अवगत असणारी व्यक्ती जगातील अनेक भाषांतील समूहांशी संवाद साधू शकेल, असेही विवेक सावंत यांनी सांगितले. भाषा फाउंडेशनतर्फे यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘भाषा ऑलिम्पियाड’ घेण्यात येणार असल्याचे स्वाती राजे यांनी सांगितले.