नवरात्रीमध्ये चतुशृंगी मंदिराच्या परिसरामध्ये कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात येणार असून उत्सावाच्या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी ही यात्रा प्लास्टिकमुक्त करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती चतुशृंगी सेवा समितीचे अध्यक्ष सुभाष अनगळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
चतुशृंगी उत्सवाची घटस्थापनेपासून (५ ऑक्टोबर) सुरुवात होणार असून कोजागरी पौर्णिमेपर्यंत (१८ ऑक्टोबर) होणार आहे. या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या कालावधीमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये कम्युनिटी रेडिओ सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय हा उत्सव प्लास्टिकमुक्त व्हावा यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. या कालावधीमध्ये ग्रीन हिल संस्थेच्या वतीने निर्माल्याचा टेकडीवरील झाडांसाठी खत म्हणून वापर करण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. परिसराच्या स्वच्छतेसाठी फ्युचर फॅसिलिटी संस्थेचे २५ स्वयंसेवक काम करणार आहेत.
खाद्यपदार्थ, पूजा साहित्य आणि इतर विविध वस्तूंचे १० स्टॉल्स या जत्रेमध्ये असणार आहेत. उत्सवाच्या कालावधीमध्ये २०० पोलिस, २५ होमगार्ड्स, २५ सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. या परिसरामध्ये १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय ५० स्वयंसेवक उत्सव काळामध्ये कार्यरत राहणार आहेत.