सिंहगड एक्सप्रेसला दररोज उशीर होत असल्याने आज सकाळी लोणावळा रेल्वे स्थानकात संबंधित रेल्वे प्रशासनाला जाब विचारत  प्रवाशांनी अधिकाऱ्याला घेराव घातला होता.  सिंहगड एक्सप्रेस पुण्यातून सुटल्यानंतर लोणावळ्यात वेळेवर पोहचते, परंतु पुढे जात असताना मात्र या गाडीला किमान ४० मिनिटं उशीर होतो असा आरोप प्रवाशांंनी केला असून त्याचे उत्तर द्या असे म्हणत रेल्वे अधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला.

पाहा व्हिडिओ

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा आणि मावळ परिसरातील अनेक नागरिक हे मुंबई शहरात नोकरी करतात. ते रेल्वेचा आधार घेऊन पुणे ते मुंबई असा प्रवास करतात मात्र या प्रवाशांना उशीर होतो.  याचं महत्त्वाचं कारण हे आहे की, सिंहगड एक्सप्रेस ही पण्यातून वेळेवर निघून लोणावळा येथे वेळेत पोहचते. मात्र, त्यानंतर ४० मिनिटे सिंहगड एक्सप्रेसला उशीर होतो असा आरोप प्रवाशांनी केला. त्यामुळे मुंबईत नोकरीसाठी असलेल्या नोकरदार वर्गाने आज सकाळी पुन्हा उशीर झाल्याने संबंधित रेल्वे अधिकाऱ्याला घेराव घालत धारेवर धरले. सिंहगड एक्सप्रेस थांबवून मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. एक्सप्रेस ला उशीर होत असल्याने अनेकांना याचा फटका बसतो. त्यामुळे चिडलेल्या नोकरदार वर्गाने आज रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.