30 May 2020

News Flash

प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हेच उत्तम माध्यम

प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग असून या माध्यमाला सध्या तरी पर्याय दिसत नाही, असे मत राज्य लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष आणि

प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग असून या माध्यमाला सध्या तरी पर्याय दिसत नाही, असे मत राज्य लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) माजी अध्यक्ष आणि सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले. तुम्ही पात्र असाल तरच निवडले जाल, नसाल तर कोणीही तुमची निवड करू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
स्टडी सर्कलतर्फे आयोजित सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. आगरवाल यांच्या हस्ते झाले. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, ‘एमपीएससी’चे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, मावळते संमेलनाध्यक्ष रंगनाथ नाईकडे, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, स्टडी सर्कलचे आनंद पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद शिरसाट या वेळी उपस्थित होते.
पुणे ही स्पर्धा परीक्षा तयारीची राजधानी असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, तुमच्या प्रत्येकामध्ये क्षमता असल्याने न्यूनगंड बाळगू नका. तुमची आर्थिक, सामाजिक परिस्थिती काहीही आणि कशीही असली तरी अधिकारी होण्याची निवड प्रक्रिया ही तुमच्यातील त्या गुणांना शोधून न्याय देते. गुणवत्तेशिवाय अन्य कोणताही घटक यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अन्य व्यावसायिक क्षेत्रासाठी तुमची आपोआप तयारी होत असते हे जाणून त्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांनाही कमी लेखू नका. प्रत्येक क्षेत्रात जनतेची सेवा करण्याची संधी आहे.
स्पर्धा कोणाशी हे निश्चित करून वेळ आणि प्रश्नांचे नियोजन करा. आत्मविश्वास वाढवा आणि प्रशासकीय सेवेचे काम करण्याच्या यशाचे शिखर गाठा, असे पंडित विद्यासागर यांनी सांगितले. आगरवाल म्हणाले, स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये सहा वर्षे घालवली तर वय वाढते आणि अन्य संधी हातून निसटू शकतात हे ध्यानात घेऊन अनेकजण पदवी संपादन करतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. अर्ज केलेल्या प्रत्येकालाच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकत नाही.
एकेकाळी प्रशासनाने संपूर्ण देशावर राज्य करणारे मराठे प्रशासकीय सेवेत मागे का, असा प्रश्न उपस्थित करून मोरे यांनी जे काम सरकारने करायला हवे ते स्टडी सर्कल करीत असल्याचे सांगितले. वरिष्ठ पदावर काम करताना भ्रष्ट मार्गाचा अवलंब न करता सामाजिक बांधिलकी जपतील असे संस्कार विद्यार्थ्यांवर करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आनंद पाटील आणि विनोद शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले.
किती वर्षे स्पर्धा परीक्षांना देणार
एकाग्रचित्त होत नसले आणि यश संपादन करता येणार नसेल तर आयुष्यातील किती वर्षे स्पर्धा परीक्षा देण्यामध्ये घालवायची हे विद्यार्थ्यांनी ठरविले पाहिजे, असे डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले. एकाच गोष्टीमागे लागू नका. देशाला विविध क्षेत्रांत मनुष्यबळ अपेक्षित आहे. जबाबदार तरुणांनी घरच्या आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण, स्पर्धा परीक्षांचे वेड लावून घेत नैराश्य येऊ देऊ नका, असेही गाडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2016 2:30 am

Web Title: competitive examination medium of administrative officer selection
टॅग Selection
Next Stories
1 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू
2 नव्या दमाच्या कलाकारांचे गायन संकेतस्थळावर
3 भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दीड वर्षांच्या बालकाचा मृत्यू
Just Now!
X