कन्हैया कुमारला भाषणासाठी पुण्यात आणले तर आयोजकांना ठोकून काढू, अशी धमकी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी ओंकार कदम यांनी आपल्याला दिल्याची तक्रार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचा (रानडे इन्स्टिट्यूट) विद्यार्थ्यांनी केली आहे. तक्रारीचा अर्ज त्यांनी डेक्कन पोलिसांकडे दिला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येते आहे.
विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे दिलेल्या अर्जामध्ये, बुधवारी सकाळी विद्यार्थी संस्थेच्या कॅंटिनमध्ये बसले असताना, ओंकार कदम यांनी तिथे येऊन विद्यार्थ्यांना धमकावले. जर कन्हैया कुमारला पुण्यात आणणार असाल, तर ठोकून काढू. ज्याला कन्हैया कुमारचे विचार ऐकायचे असतील, त्यांनी दिल्लीला जावे. पुण्यात कार्यक्रम केला तर आयोजकांना पकडू, अशी धमकी त्याने दिल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
या धमकीमुळे आम्हाला आमच्या जीविताची काळजी वाटते, असेही तक्रारदार विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. बुधवारी हे पत्र डेक्कन पोलिसांकडे देण्यात आले आहे.
या संदर्भात ओंकार कदम यांची बाजू समजलेली नाही.