भामा आसखेड धरण कार्यालयात घुसून जबरदस्तीने उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्यांना दमबाजी करून धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडल्याप्रकरणी धरणग्रस्त शेतकऱ्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, या गुन्ह्यात चक्क मृत धरणग्रस्त शेतकऱ्याचे नाव टाकण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करंजविहिरे येथील भामा आसखेड कार्यालयात १०० धरणग्रस्त शेतकरी आले होते. त्यांनी बळजबरीने कार्यालयात जाऊन तेथील उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांच्यासह तेथील कर्मचाऱ्याना दमबाजी करत धरणातील सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले होते. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार केली होती. परंतु यात काही महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या नामदेव बांदल यांचं नाव देखील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाकण परिसरात खळबळ उडाली आहे.

उपाविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी स्वतः चाकण पोलिसांत ७ एप्रिल रोजी फिर्याद दिली असून मृत नामदेव बांदल यांच्यावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दि. ६ एप्रिल रोजी १०० धरणग्रस्त शेतकरी हे कार्यालयात आले होते. त्यांच्या प्रलंबित मागण्या होत्या. तसेच त्यांचे पुनर्वसन झाले नाही. हे सर्व प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून पाणी सोडू देणार नाहीत असा दम धरणग्रस्त शेतकऱ्यांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चुकून मृत व्यक्तीचे नाव आले..
फिर्याद ही उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी दिली होती. त्यात मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना देविदास बांदल यांचं नाव द्यायचे होते. परंतु, नाव चुकून मृत नामदेव बांदल यांचं लिहिण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे. आज सकाळी २०० ते ३०० धरणग्रस्त शेतकरी चाकण पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी हे गुन्हे खोटे असल्याचे म्हटले आहे. आम्ही योग्य तो तपास करून चौकशी करू, असे शेतकऱ्यांना सांगितल्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी सांगितले.