एक जण एस.टी. महामंडळाच्या बसद्वारे पार्सल पाठवतो. ते व्यवस्थित न हाताळल्याने खराब होते. त्याबाबत पार्सल कंपनीकडे विचारणा करायला गेल्यावर उत्तर मिळते- पार्सलचे नुकसान होतच असते, त्यात काही विशेष नाही! बाब फार पैशाची नव्हती, पण मुद्दा होता विस्कळीत सेवेचा आणि त्यामुळे झालेल्या त्रासाचा.. ग्राहक न्यायमंचाने याची दखल घेतली आणि पार्सलचे कंत्राट पाहणाऱ्या अंकल पार्सल्स अॅन्ड फॉरवर्ड्स प्रा. लि. कंपनीला फटकारले.
पार्सल पाठवणाऱ्या नागरिकाला त्याने पाठवलेल्या मालाची रक्कम आणि नुकसान भरपाई म्हणून तीन हजार रुपये देण्याचे आदेश मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात यांनी दिले. या प्रवाशाचे अल्पसे नुकसान झाले तरी अनेक प्रवाशांना अशा पद्धतीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना काहीच दाद मिळत नसल्यामुळे मंचाकडे दावा दाखल करून स्वत: न्यायालयात युक्तिवाद करीत हा दावा जिंकला.
संतुक माणिकराव पाटील (रा. साई कॉर्नर, स्वेदगंगा सोसायटी, वारजे) यांनी जळगाव येथील अंकल पार्सल्स अॅन्ड फॉरवर्ड्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पुण्यातील शिवाजीनगरच्या कंपनीच्या प्रतिनिधीच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. पाटील पुण्यात एका जाहिरात एजन्सीमध्ये समन्वय म्हणून काम करतात. परभणी येथील एका नातेवाईकाने एसटी महामंडळाच्या पार्सलमध्ये धान्याच्या पाच गोण्या त्यांना पाठविल्या होत्या. शिवाजीनगर येथे पार्सलचे एक हजार त्रेपन्न रुपये देऊन त्यांनी पार्सल सोडवून घेतले. त्यावेळी त्यांना पाच गोण्यांपैकी तीस किलो तूरडाळ व पंधरा किलो मूगडाळ खराब झालेली दिसली. पार्सल कंपनीच्या कामगारांनी एसटीवरून गोण्या फेकल्यामुळे पाटील यांच्या काही गोण्यांवर रासायनिक पदार्थ सांडला होता. त्यामुळे त्यांनी याबाबत पार्सल कंपनीच्या शिवाजीनगर प्रतिनिधीकडे तक्रार केली. त्यावेळी त्यांना ‘पार्सलचे नुकसान होतच असते, त्यात काही विशेष नाही’ असे उत्तर मिळाले. नुकसान भरपाईसाठी त्यांना जळगावच्या मुख्य कार्यालयाकडे तक्रार करण्यास सांगितले.
पाटील यांनी फॅक्सद्वारे मुख्य कार्यालयाकडे तक्रार करून साडेतीन हजार रुपयांचे नुकसान झाल्यामुळे भरपाई मागितली. त्यावेळी त्यांनी फक्त तीनशे रुपये नुकसान भरपाई घ्या, अन्यथा नव्वद दिवसांनंतर तक्रारीची चौकशी केली जाईल, असे कळविले. त्यामुळे पाटील यांनी एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात तक्रार केली. या कार्यालयाने त्यांची तक्रार पार्सल कंपनीकडे पाठविली. त्यानंतर पार्सल कंपनीने सहाशे रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. पण, ही सुद्धा रक्कम कमी असल्यामुळे त्यांनी ग्राहक मंचात अंकल पार्सल्स अॅन्ड फॉरवर्ड्स प्रा. लि. विरुद्ध दावा दाखल केला. कंपनीने त्यांच्या वकिलामार्फत उपस्थित राहून त्यांचे म्हणणे सादर केले. तक्रारदाराची मागणी अवास्तव आहे. त्रास देण्याच्या उद्देशाने ही तक्रार दाखल केल्याचे सांगत तक्रार फेटाळून लावण्याची मागणी केली. मंचाकडे तक्रारदाराने खराब झालेल्या गोणीचे फोटो दाखल केले होते. तसेच काही कागदोपत्री पुरावा दाखल केला होता. त्यामुळे मंचाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून पार्सल कंपनीने निकृष्ठ दर्जाची सेवा दिल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. निकृष्ठ सेवेबद्दल दोन हजार आणि त्रासापोटी एक हजार असे तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला.

एसटी महामंडळाने राज्यातील सर्व पार्सलचे कंत्राट अंकल पार्सल्स अॅन्ड फॉरवर्ड्स प्रा. लि. दिले आहे. मात्र, या कंपनीच्या ठेकेदारावर एसटी महामंडळाचे काहीच नियंत्रण नाही. पार्सलमध्ये अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पार्सल संदर्भात सुरुवातीला एसटी महामंडळाच्या शिवाजीनगर व्यवस्थापकाकडे तक्रार केली. पण, त्यांनी त्याची काहीच दखल घेतली नाही.  या दाव्यामध्ये वेळ आणि मनस्ताप खूप झाला. पण, एसटी महामंडळाचा गलथान कारभार समोर यावा आणि इतर प्रवाशांना याची माहिती व्हावी म्हणून शेवटपर्यंत स्वत: केस लढलो, असे तक्रारदार संतुक पाटील यांनी सांगितले.