कामांचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

बाणेर-बालेवाडी आणि पाषाणमधील विविध विकासकामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश महापलिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी अपेक्षित असलेल्या उपाययोजना, आवश्यक निधी, अंदाजपत्रकीय तरतूद, नकाशे आणि अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभागातील विकासकामांची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी केली. या वेळी महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

राम नदी सुशोभीकरण, महाबळेश्वर हॉटेल येथील वाहतूक नियोजन, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, कचरा वर्गीकरण केंद्र, बालाजी चौक येथील वाहतुकीचे नियोजन, पाषाण परिसरातील मलनिस्सारण प्रकल्प, सूस खिंड रस्ता, बालेवाडी स्काय वॉक सेंटर, भुयारी मार्ग, जकात नाक्याशेजारील कचरा वर्गीकरण केंद्र, उद्यानाचे आरक्षण, मार्केट, क्रीडांगणासाठीच्या आरक्षित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अशा विविध कामांबाबत आयुक्तांनी संबंधितांबरोबर चर्चा केली तसेच जागांची पाहणी केली. प्रकल्पासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी कामांचा अहवाल सादर करण्यात यावा, असेही सौरभ राव यांनी या वेळी सांगितले.

समन्वय आवश्यक

औंध-बाणेर-बालेवाडी या भागाची स्मार्ट सिटी अभियनाअंतर्गत क्षेत्रनिहाय विकास विभागासाठी निवड करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट लिमिटेड या कंपनीकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मोठी गुंतवणूक या भागात प्रकल्पांच्या माध्यमातून होणार आहे. याशिवाय विकास आराखडय़ातही या भागासाठी काही जागा विविध सार्वजनिक प्रकल्पांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. शहराचा उच्चभ्रू आणि झपाटय़ाने विकसित होत असलेला भाग अशी औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण भागाची ओळख आहे. त्यामुळे विकास कामे करताना स्मार्ट सिटी कंपनीबरोबर प्रशासनाला समन्वय साधावा लागणार आहे. बालेवाडी परिसरात ट्रान्झिट हब प्रस्तावित असून ट्रान्झिट हबमुळे या भागातील वाहतूक सेवेमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि स्मार्ट सिटी यांना भविष्यात समन्वयाने काम करावे लागणार आहे.