संगणकावर काम करणे म्हणजे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान.. पण याला पुणे पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी अपवाद आहे. नुसताच अपवाद नाही तर त्याने संगणकाचे संपूर्ण ज्ञान मिळवत पुणे पोलीस दलासाठी उपयोगी ठरणाऱ्या नऊ संगणक प्रणाली बनवल्या आहेत. बारावी उत्तीर्ण असलेल्या पोलीस कर्मचारी दलाचा ‘संगणक अभियंता हवालदार’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या प्रणालींमुळे पोलीस दलाचे लाखो रुपये वाचविले आहेत. या कर्मचाऱ्याला अजूनही संगणक क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे.
या पोलीस हवालादाराचे नाव आहे रवींद्र इंगवले. ते पुण्यातीलच नांदेडगावचे राहणारे. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयचे शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. १९९४ साली बिनतारी संदेश विभागात रुजू झाले. १९९८ पर्यंत इंगवले यांना संगणकाचे काहीच ज्ञान नव्हते. मात्र, विज्ञान शाखेत शिक्षण झाल्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची त्यांना आवड होती. या आवडीतूनच त्यांनी काहीतरी वेगळे करण्याच्या भावनेतून १९९९ साली सीडॅकचा संगणकासंदर्भातील एक अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यानच्या काळात त्यांनी पुण्यातील बिनतारी संदेश विभागात बदली झाली. या ठिकाणी त्यांनी एक संगणक प्रणाली बनविल्यानंतर तत्कालीन वायरलेसचे अतिरिक्त महानिरीक्षक संजीव कुमार सिंघल यांनी त्यांना हेरले. सिंघल हे पुण्यात सहआयुक्त झाल्यानंतर त्यांनी इंगवले यांना पुणे पोलीस दलात बोलवून घेतले आणि इंगवले यांनी शहर पोलीस दलासाठी वेगवेळ्या नऊ संगणक प्रणाली बनविल्या.
गणेशोत्सवाच्या काळात पाच हजार विद्यार्थ्यांना पोलीस मित्र करण्यात आले होते. दोन दिवसांत त्या विद्यार्थ्यांचा अद्ययावत डाटा तयार करून त्यांना कामाचे वाटप करायचे होते. यासाठी दोन दिवसांत इंगवले यांनी संगणक प्रणाली बनवून प्रत्येक विद्यार्थ्यांला बल्क एसएमएसच्या माध्यमातून कामाचे वाटप केले. त्याबरोबरच इंगवले यांनी १९३२ ते २०१४ दरम्यानच्या शस्त्र परवान्याच्या माहितीचे डिजिटायझेशन करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली. यामध्ये शहर पोलीस दलाकडून दिलेले शस्त्र परवाने आणि बाहेरच्या राज्यात दिलेले पण या ठिकाणी नोंदणी असलेल्यांची माहिती या प्रणालीत भरली आहे. त्याबरोबरच पूर्वी हॉटेल परवान्याच्या अनेक नोंद वह्य़ा होत्या. कोणाची मुदत संपली हे पाहत बसावे लागत होते. पण, त्यासाठी सुद्धा इंगवले यांनी संगणक प्रणाली विकसित केली. त्यामुळे हॉटेल परवान्याची मुदत संपल्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्याचे काम सोपे झाले. पोलीस क्वार्ट्र्स किती आहेत. कोण वापरते या बाबतही व्यवस्थित माहिती नव्हती. त्यासाठी सुद्धा इंगवले यांनी अ‍ॅप बनविले आहेत. त्याबरोबरच पोलीस अधिकाऱ्यांच्या पे स्लीपचे, वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची पीपीएफची पावती देण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्याबरोबरच मंत्रालयात तक्रार अर्ज केल्यानंतर ते पुन्हा पुणे पोलिसांकडे पाठविले जात. त्याची सविस्तर माहिती ठेवणारी देखील प्रणाली विकसित केल्यामुळे काम सोपे झाले आहे.
याबाबत इंगवले यांनी सांगितले, की पहिल्यापासूनच तंत्रज्ञानाची आवड होती. पोलीस दलात येऊन दैनंदिन नोकरी व्यतिरिक्त काहीतरी वेगळे करायचे या हेतूने संगणकसंदर्भातील वेगवेगळे छोटे अभ्यासक्रम पूर्ण केले. हे काम करून घेण्यासाठी लाखो रुपये खर्च झाला असता. पोलीस दलातील असल्यामुळे रात्री सुद्धा जागून काम केले आहे. ‘या कामामुळे मी खूप समाधानी आहे. हे काम करीत असताना पत्नी व मुलांना वेळ देता आला नाही. त्यामुळे त्यांचे देखील माझ्या कामात मोठे योगदान आहे.’ अशा त्यांच्या भावना आहेत.  
पासपोर्टसाठी नवीन संगणक प्रणाली
परकीय नोंदणी विभागात रवींद्र इंगवले नेमणुकीस आहेत. या विभागाचा परदेशी नागरिकांशी सतत संपर्क येतो. या ठिकाणी आलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या पासपोर्टवर मुदतीची माहिती हाताने लिहून दिली जात होती. त्यामध्ये काही वेळा मॅन्युअली चुका होत होत्या. मात्र, आता यासाठी पोलीस उपायुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंगवले यांनी एक संगणक प्रणाली विकसित केली आहे. मुदतीसाठी पासपोर्टवर हाताने न लिहिता लेबल चिटकावून त्यावर शिक्का मारण्याची यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे परदेशी नागरिकांना सुद्धा ही यंत्रणा आवडली. त्याबरोबरच कामामध्ये अचूकता आली आहे.