गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोप; दोघांवर गुन्हा

पुणे : हिंजवडी भागातील एका प्रसिद्ध माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील अभियंता युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कंपनीतील वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

चेतन वसंतराव जायले (वय २६, रा. बालाजी हाउसिंग सोसायटी, बालेवाडी फाटा) असे आत्महत्या केलेल्या संगणक अभियंता युवकाचे नाव आहे. जायलेचे बंधू कुंदन यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रवी अचला आणि हेमंत खडके यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जायले हिंजवडीतील एका प्रसिद्ध आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होते. सहा महिन्यांपूर्वी जायले यांची कंपनीतील एका गटातून दुसऱ्या गटात बदली करण्यात आली. या गटाचे प्रमुख म्हणून अचला काम करतात. अचला यांची नेमणूक कंपनीच्या इंग्लड  येथील कार्यालयात करण्यात आली आहे. तर खडके कंपनीच्या हिंजवडीतील कार्यालयात नेमणुकीस आहेत. तीन दिवसांपूर्वी जायले यांनी बालेवाडीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांनी सांगितले.