खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरच्या भरमसाठ खर्चातून आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशा रुग्णांना शहरी गरीब योजनेतून उपचारांच्या खर्चात सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने बुधवारी घेतला.
खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या किंवा व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोश्वासावर) ठेवलेल्या रुग्णांसाठी शहरी गरीब योजनेसाठीची कागदपत्रे सादर केल्यास त्याला उपचारांच्या खर्चात एक लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपप्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘एक लाख रुपयांच्या आतील वार्षिक उत्पन्नाचा दाखला असलेल्या, दारिद्य््रयरेषेखालील रुग्णांना किंवा पिवळे रेशन कार्डधारक रुग्णांना शहरी गरीब योजनेचा लाभ मिळू शकतो. यात रुग्णाला एका वर्षांत जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळतो. रुग्णालयाचे बिल जितक्या रुपयांचे झाले असेल त्याच्या निम्मी रक्कम रुग्णाला पालिकेकडून या योजनेतून एका वेळी मिळते. रुग्णाला स्वाईन फ्लूवरील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल केले असेल परंतु त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले नसेल तरीही त्याला याचा लाभ मिळेल. महापालिकेशी जोडलेल्या व्हेंटिलेटरची सोय असलेल्या १३ खासगी रुग्णालयांना हा निर्णय लागू आहे.’’
पुण्यात सध्या ११६ स्वाईन फ्लू रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून यातील २६ जणांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आले आहे. याशिवाय आणखी ५ संशयित स्वाईन फ्लू रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयात उपचार घेणारे बहुसंख्य रुग्ण खासगी रुग्णालयातच दाखल असून शासकीय संस्थेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या नगण्य आहे.