आयुक्तांच्या ‘शुद्धिपत्रका’मुळे गल्लीबोळात, प्रमुख रस्त्यांवर क्राँक्रिटीकरणाची कामे करण्याचा मार्ग मोकळा

काँक्रिटीकरण केलेले रस्ते समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी उखडावे लागू नयेत, यासाठी  १२ मीटपर्यंत रुंदी असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर र्निबध घालण्यात आले होते. मात्र आयुक्तांच्या शुद्धिपत्रकामुळे काँक्रिटीकरणाचा धडाका कायम राहणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. पुढील पंधरा दिवसांत गल्लीबोळात, प्रमुख रस्त्यांवर सरसकट काँक्रिटीकरणाची कामे करण्याचा मार्गही या शुद्धिपत्रकामुळे मोकळा झाला आहे. अंदाजपत्रकातील निधी शिल्लक राहू नये यासाठी काँक्रिटीकरणाची कामे थांबवू नयेत, हा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आग्रह आणि दबावामुळे पुणेकरांचे तब्बल ५०० कोटी रुपये वाया जाणार आहेत.

शहराला २४ तास अखंड पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येत्या काही दिवसांमध्ये कामे सुरू होणार आहेत. सध्या अंदाजपत्रकातील निधी मार्च महिन्याअखेपर्यंत संपविण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे सुरू आहेत. प्रमुख रस्ते, चौक, उपरस्ते, जोडरस्त्यांवर ही कामे सुरू आहेत. समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाल्यानंतर नव्याने केलेले हे रस्ते उखडावे लागणार असल्यामुळे काँक्रिटीकरणाच्या कामांवर र्निबध घालावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आयुक्तांनीही ५ मार्च रोची त्याबाबत परिपत्रक काढले होते. त्यानुसार १२ मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करता येणार नाही आणि त्यापुढील म्हणजे १२ मीटर रुंदीपुढील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करावयाचे झाल्यास पाणीपुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक राहील, असे या परिपत्रकात म्हटले होते. आयुक्तांच्या या परिपत्रकाला नगरसेवकांनी पहिल्यापासूनच विरोध दर्शविला होता. स्थायी समितीनेही हा प्रस्ताव फेटाळला होता. काहीही झाले तरी, काँक्रिटीकरणाची कामे थांबविण्यात येऊ नये, असा आग्रहच भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे धरला होता. आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात हा आदेश काढल्यानंतर प्रशासनाकडून काही रस्त्यांची कामेही थांबविण्यात आली होती. ही कामे बहुतांश भाजप नगरसेवकांची असल्यामुळे त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. नगरसेवकांची नाराजी असल्यामुळे कामे बंद करण्याचे परिपत्रक मागे घेण्यात यावे, यासाठी आयुक्तांवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली होती. यासंदर्भात महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची महापौर दालनात गुरुवारी बैठकही झाली होती. त्यानुसार आयुक्तांनी शुद्धिपत्रक काढून ही कामे एक एप्रिलपर्यंत करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणाचा धडाका शहरात कामय राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

५०० कोटींची कामे प्रस्तावित

प्रभागात विविध विकासकामे करण्यासाठी अंदाजपत्रकात नगरसेवकांना निधी दिला जातो. हा निधी मार्च महिन्याअखेपर्यंत संपविणे नगरसेवकांना बंधनकारक असते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध प्रकारची कामे सुरू झाली आहेत. त्यातही प्रामुख्याने सिमेंट काँक्रिटचे रस्ते करण्यावर नगरसेवकांचा भर राहिला आहे. सिमेंट काँक्रिटचे रस्ते करणे आणि त्यांची दुरुस्ती यावर मोठा खर्च होतो. समान पाणीपुरवठा योजनेमुळे हे रस्ते उखडावे लागणार आहेत. सध्या किमान पाचशे कोटींची कामे प्रस्तावित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महापालिकेने २ हजार १०० किलोमीटर लांबीचे जे रस्ते केले आहेत त्यापैकी ६०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. शहरात १३५० किलोमीटरचे रस्ते डांबरी असून समान पाणीपुरवठा योजनेसाठी १ हजार ४०० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदावे लागणार आहेत.