25 March 2019

News Flash

केवळ ‘सिमेंटलेपन’

बालगंधर्व ते डेंगळे पूल हा रस्ता पुणे स्टेशन, आरटीओकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

बालगंधर्व ते डेंगळे पूल रस्त्यावरील प्रकार; महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील रुंद आणि प्रशस्त रस्त्यांवरही काँक्रिटीकरणाचा धडाका महापालिकेने लावला असून बालगंधर्व रंगमंदिर ते डेंगळे पूल दरम्यानच्या सुस्थितीतील रस्त्याचेही काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. मुख्य म्हणजे मानकांप्रमाणे रस्ता न खोदता हा रस्ता फक्त जेसीबीने खरवडण्यात येत असून त्याच्यावरच घाईगर्दीने काँक्रिटीकरण केले जात आहे. हे काँक्रिटीकरणही चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत, मात्र या कामापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महापालिका भवनातील कोणालाही या कामातील दोष अद्याप दिसलेले नाहीत.

जंगली महाराज रस्त्याच्या पुनर्रचनेमुळे मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याचा अनुभव पाठीशी असतानाच आता, बालगंधर्व ते डेंगळे पूल या दरम्यानच्या रस्त्याच्या पुनर्रचनेचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. पुणे स्टेशन, आरटीओ या भागाला जोडणारा हा रस्ता पुनर्रचनेमुळे अरूंद होणार असून या रस्त्याची कामे चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचे पुढे आले आहे.

नियमानुसार मूळ रस्त्याचे डांबर काढून खोदाई करून नंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण आवश्यक असले तरी ती पद्धत या कामात वापरण्यात आलेली नाही. आवश्यक तेवढीही खोदाई न करता केवळ सध्याच्या रस्त्यावरील डांबर खरवडून त्यावर काँक्रिटीकरण केले जात आहे. त्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही दिसत आहे. बालगंधर्व रंगमंदिर ते डेंगळे पूल या दरम्यान हे काम होणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांची उधळपट्टी महापालिका करणार आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून काँग्रेस भवन परिसरात एका बाजूने कामे सुरु आहेत. मात्र ती चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या पथ विभागाकडे करण्यात आल्या आहेत.

बालगंधर्व ते डेंगळे पूल हा रस्ता पुणे स्टेशन, आरटीओकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर टप्प्याटप्प्याने कामे करण्यात येणार आहेत. सलग पदपथही रस्त्यावर ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. या रस्त्यावर सायकल मार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे सुस्थितीतील या रस्त्याचीही मोडतोड होणार आहे.

महापालिकेचा दावा

वाहतुकीची कोंडी सुटावी यासाठी अर्बन स्ट्रीड डिझाईनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या रस्त्याची रचना करण्यात येणार आहे. रस्त्याची पुनर्रचना होत असताना ते अरूंद होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. पदपथांची रुंदीही त्यादृष्टीने वाढविण्यात येणार आहे, असा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला.

पुनर्रचना वाहनचालकांना अडचणीची

शहरातील रस्तारुंदीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे. मध्यवर्ती भागातील अरूंद रस्त्यांचा फटका वाहतुकीला बसत आहे. प्रमुख रस्त्यांसह छोटय़ा जोड रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे रस्तारुंदीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्याची आवश्यकता असताना त्याऐवजी रस्त्यांची पुनर्ररनचा आणि सुशोभीकरण करून रस्ते वाहतुकीसाठी अरूंद करण्याचा घाट का घालण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुनर्रचनेचे धोरण वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरणार आहे.

First Published on March 14, 2018 5:16 am

Web Title: concretization of road between bal gandharva rang mandir to dengle bridge