News Flash

लग्न समारंभासाठीच्या अटी शहरासाठी लागू नाहीत

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन पुणे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना गुरुवारी मागण्यांचे निवेदन दिले. किशोर सरपोतदार, संजीव वेलणकर, प्रकाश डिंगणकर आणि विनय ताटके या वेळी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे स्पष्टीकरण

पुणे : लग्न समारंभाकरिता शासनाकडून जारी करण्यात आलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नसल्याचे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरुवारी दिले. लग्न समारंभाची पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन पुणे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी केटर्स आणि मंगल कार्यालय व लॉन्सचालकांनी पाळावयाच्या अटींविषयी आक्षेप घेणारे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले. त्या वेळी झालेल्या चर्चेत विक्रम कुमार यांनी लग्न समारंभासाठी जारी करण्यात आलेल्या अटी पुणे शहरासाठी लागू नसल्याचे स्पष्ट केले. किशोर सरपोतदार, संजीव वेलणकर, प्रकाश डिंगणकर आणि विनय ताटके या वेळी उपस्थित होते.

विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहरात लग्न समारंभासाठी पन्नास जणांची मर्यादा आहे. परंतु, त्यामध्ये फक्त वधू आणि वर पक्षाच्या लोकांचाच समावेश असेल. त्यामध्ये भटजी, वाढपी यांचा समावेश नाही. तसेच लग्नासाठी पोलीस परवानगीची गरज नाही. लग्न समारंभाची सीडी पोलीस चौकीला जमा करायची नाही. त्याचप्रमाणे लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या पन्नास जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करायची नाहीत. त्यासंदर्भात मंगल कार्यालय, लॉन्स मालक-चालक आणि केटरर या कोणाकडूनही लेखी हमीपत्र घ्यायचे नाही. लग्न समारंभाची पाहणी करण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा येणार नाही.

शासनाने जारी केलेल्या आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करण्याची हमी केटरिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन आणि केटरिंग असोसिएशन पुणे या संस्थेचे पुण्यातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्सचालक, मालक आणि केटर्स असे अडीचशेहून अधिक सभासद आहेत, असे सरपोतदार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:22 am

Web Title: conditions for the wedding ceremony not apply in pune city zws 70
Next Stories
1 शहरातील दहा हजार रुग्ण गृहविलगीकरणात
2 मार्केटयार्डातील मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग
3 आरोग्य सेवेचे बळकटीकरण कागदावरच
Just Now!
X