भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव आणि विद्यापीठाच्या दंत महाविद्यालयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शुक्रवारपासून (७ मार्च) ‘रीइन्व्हेंटिंग अॅकॅडमिक अँड क्लिनिकल एक्सलन्स’ (रेस) या तीन दिवसांच्या दंतवैद्यक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
परिषदेच्यानिमित्ताने भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. धनकवडी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शनिवारी (८ मार्च) भारतीय दंत परिषदेचे (डेन्टल कौन्सिल ऑफ इंडिया) अध्यक्ष डॉ. दिव्येंदू मुजूमदार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेचे कार्यकारी सचिव कर्नल (निवृत्त) डॉ. एस. के. ओझा, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरु डॉ. शिवाजीराव कदम, सचिव विश्वजित कदम या वेळी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत विविध शाखांतील ८०० तज्ज्ञ सहभागी होणार असून ‘कृत्रिम दंतरोपण आणि दंत व्यंगोपचार’ या विषयावर व्याख्याने होणार आहेत, अशी माहिती प्राचार्या डॉ. अमिता माळी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.