शैक्षणिक सहलींदरम्यान काय काळजी घ्यावी याबाबतची नियमावली राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून यापूर्वीच लागू करण्यात आली आहे. सहलींच्या जुन्या नियमांमध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाहीत, असे स्पष्टीकरण या विभागांतील अधिकाऱ्यांनी दिले. मात्र पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकामुळे राज्यभरातील शाळांमध्ये सहलींच्या आयोजनाबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुण्यातील एका महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान मुरूड येथील दुर्घटनेत १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर पुणे विभागीय शालेय शिक्षण उपसंचालकांकडून समुद्रकिनारे, नद्या, टेकडय़ा अशा ठिकाणी सहली नेण्यास बंदी घालण्यात आल्याचे पत्रक काढण्यात आले. शालेय सहलींदरम्यान सुरक्षेची काळजी घेण्याबाबत राज्य संचालनालयाने यापूर्वीच नियमावली लागू केली आहे. मात्र या परिपत्रकांमध्ये समुद्र किनाऱ्यांवर सहली नेण्यास बंदी घालण्यात आली नसून सहलींदरम्यान काय काळजी घ्यावी याचे तपशील देण्यात आले आहेत. पुणे विभागाच्या पत्रामुळे राज्यभरांतील शाळांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
राज्याच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना पाण्यात पोहायला जाण्यास मनाई करावी, धोकादायक ठिकाणी सहली नेणे टाळावे, सहलीत सहभागी होण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेण्यात यावे, अधिकृत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करावा, सहलीमध्ये विद्यार्थिनी असल्यास किमान एका शिक्षिकेचा सहभाग असणे आवश्यक आहे, प्रथमोपचाराचे साहित्य बरोबर असावे, ज्या ठिकाणी सहल आयोजित करण्यात आली असेल तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती शिक्षकांना असावी, अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाविद्यालयांच्या सहलींसाठीही ठिकाणांवर बंदी नाही
सहलींदरम्यान महाविद्यालयांनी काय काळजी घ्यावी याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने गेल्यावर्षी नियमावली लागू केली आहे. त्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र आयोगाच्या नियमावलीतही कोणत्याही विशिष्ट ठिकाणी बंदी घालण्यात आलेली नाही, तर काय काळजी घ्यावी हे नमूद करण्यात आले आहे. या नियमावलीनुसार ‘पूर येणारी किंवा सातत्याने दरडी कोसळणारी ठिकाणे, तीव्र उताराच्या जागा अशा ठिकाणी सहली नेणे टाळावे,’ असे नमूद करण्यात आले आहे.

‘राज्यशासनाने सहलींबाबतची नियमावली यापूर्वीच लागू केली होती. राज्यशासनाच्या या नियमावलीचा संदर्भ, पुणे, पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाच्या सहलींची नियमावली आणि आम्हाला योग्य वाटलेल्या गोष्टींचा समावेश करून सहलींबाबत सूचना देणारे पत्र पुणे विभागातील शाळांसाठी काढण्यात आले आहे.’
– रामचंद्र जाधव, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक