राज्यामध्ये काँग्रेसची स्थिती मजबूत असल्यामुळे आगामी लोकसभेच्या जागावाटपासाठी २९-१९ असे सूत्र असावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसची बाजू वरचढ असल्याचे मंगळवारी सूचित केले. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी करताना सन्मानाची भावना ठेवण्यात येणार असून केंद्रामध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याला प्राधान्य असेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हवेली काँग्रेस कमिटीतर्फे खडकवासला मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. माणिकराव ठाकरे अध्यक्षस्थानी होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री अनंतराव थोपटे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्यासह आमदार, माजी खासदार आणि मेळाव्याचे संयोजक श्रीरंग चव्हाण व्यासपीठावर होते.
ठाकरे म्हणाले, २००४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी जादा जागा सोडल्या. त्यामुळे १२ आमदार अधिक निवडून आले असले, तरी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपद मागितले नाही. मात्र, राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून काँग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेसाठी काँग्रेसने २९ जागा लढवून राष्ट्रवादीला १९ जागा सोडाव्यात. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आणि गरिबांना स्वस्त दरामध्ये धान्य देणारा अन्न सुरक्षा कायदा हे शेतक ऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या जागा वाढतील याची खात्री आहे.
काँग्रेस पक्षात १९९९ मध्ये फूट पडल्यामुळे बदल झाला. एकदम पंतप्रधानपदाची स्वप्न पाहिल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांच्या निकालावर फरक पडला. त्या वातावरणाचा फटका अनंतराव थोपटे यांच्यासह मला देखील बसला. मुख्यमंत्रिपदाचा थोपटे यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला गेला, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आता आपल्यापुढे जातीयवादी शक्तींचे आव्हान आहे. फॅसिस्ट शक्ती डोके वर काढत असल्या, तरी युती सत्तेपर्यंत पोहोचेल अशी स्थिती नाही. यापूर्वी लोकसभेसाठी दोनदा आणि राज्यामध्ये एकदा ट्रायल घेऊन पाहिली आहे. भ्रमनिरास झाल्यामुळे लोकांनी पुन्हा काँग्रेसलाच कौल दिला. देशाला महासत्तेकडे नेण्याची क्षमता काँग्रेसकडेच आहे. केवळ भावनेच्या आहारी जाऊन आणि दुराग्रह करून जागा लढविण्यापेक्षा प्रामाणिक पाहणी करून गेलो, तर निश्चितपणे जागा वाढतील.
सलग दोन वेळा पराभव झाल्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने मागून घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटे आणि श्रीरंग चव्हाण यांनी केली. तर, सतत ‘सीट’ पडत असेल तर, त्यांचा वहिवाट आला कुठे, असा सवाल पतंगराव कदम यांनी केला.
अटक करण्याएवढी माहिती नाही
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. मात्र, कोणालाही अटक करण्याएवढी माहिती हाती आलेली नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविणार का, असे विचारले असता तूर्त तरी मी माझगाव किक्रेट क्लबचे सभासदत्व स्वीकारले आहे, असे मोघम उत्तर चव्हाण यांनी दिले. माजी मुख्यमंत्र्यांनी देखील अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती याकडे लक्ष वेधले असता चव्हाण यांनी या प्रश्नाला बगल दिली.