दौंड आणि इंदापूरला टँकर किंवा रेल्वेने पाणीपुरवठा करावा, ही काँग्रेसची मागणी स्थानिक नागरिकांच्या हिताची आणि पाण्याची बचत व्हावी यासाठीच होती. कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे पाण्याची गळती व चोरी होईल तसेच या पाण्याचा वापर शेतीसाठी देखील केला जाईल, असे निवेदन काँग्रेसतर्फे गुरुवारी जिल्हा प्रशासनला देण्यात आले.
खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी शहर काँग्रेसतर्फे गुरुवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, रोहित टिळक, अ. भा. काँग्रेस कमिटीचे सदस्य गोपाळ तिवारी, महापालिकेतील गटनेता व विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, अजित आपटे आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत शिंदे, तिवारी, बालगुडे यांची भाषणे
झाली.
कालव्यातून सोडलेले पाणी अन्य कारणांसाठी वापरले जाणार असल्यामुळे दौंड व इंदापूरला टँकरने पाणी द्यावे, अशी काँग्रेसची मागणी होती, असे पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.