पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमेकांवर शाब्दिक ‘हल्लाबोल’ सुरू झाला आहे. लोकसभेच्या जागेवर आमचाच हक्क असल्याचा दावा करत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार नाही, अशी ठाम भूमिका काँग्रेसने घेतली आहे. मात्र लोकसभेसाठी उमेदवार कोण, याबाबत पक्षात चर्चा सुरू झाली असून पुण्यात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त असल्यामुळे आम्हीच ही जागा लढवणार असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने वारजे येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघावरही त्यांनी दावा सांगितला होता. पवार यांच्या या विधानानंतर शहराच्या राजकीय वर्तुळात  एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल सुरू झाला आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पुण्यावर आमचाच दावा राहणार आहे, असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यावर दावा केल्यानंतर काँग्रेसने बारामती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. या दाव्याचीही पवार यांनी खिल्ली उडविली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने लोकसभेची निवडणूक लढवली होती. गेल्या काही वर्षांपासून ही जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आहे. गेल्या निवडणुकीत प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी पुण्यातून निवडणूक लढवली होती. पवार यांच्या वक्तव्यानंतर मात्र काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादीला देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे आणि लोकसभेसाठी उमेदवार कोण, याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. शहरातील मतदार काँग्रेसला मानणारा आहे. त्यामुळे ही जागा आमचीच असेल. आघाडीसंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून करण्यात आलेली मागणी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्यात येईल, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पण काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे की नाही, याचीच चर्चा आता पक्षात सुरू झाली आहे.

गेल्या निवडणुकीतील उमेदवार डॉ. विश्वजीत कदम हे पुण्यातून निवडणूक लढविणार की नाही, हे अद्यापही स्पष्ट नाही. सांगलीतून ते निवडणूक लढविण्याची शक्यता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच व्यक्त होत आहे. त्यामुळे सध्या तरी पुणे लोकसभेवर दावा कोणाचा, यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.