थोपटे समर्थकांकडून पुणे कार्यालयात दगडफेक, तोडफोड

मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस भवनमध्ये रण‘संग्राम’ घडवून आणला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आलेल्या कार्यकर्त्यांच्या जमावाने काँग्रेस भवनवर जोरदार दगडफेक करून तोडफोड केल्याने काँग्रेस भवनात सर्वत्र काचांचा खच पडला होता. काँग्रेस भवनावर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.

हा हल्ला झाला तेव्हा शहर प्रवक्ते रमेश अय्यर, ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सहसचिव कीर्ती भोसले आणि कर्मचारी पोपट पाटोळे हे चार जण काँग्रेस भवनात उपस्थित होते.   साडेपाचच्या सुमारास संग्राम थोपटे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनमध्ये प्रवेश केला.  जिल्हा काँग्रेसचे कार्यालय बंद असल्याने त्यांनी आपला मोर्चा शहर काँग्रेस अध्यक्षांचे कार्यालय तसेच इंटक कार्यालयाकडे वळविला. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलवरच्या काचा, कार्यालयातील दूरचित्रवाणी संच आणि खिडक्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून बाकीचे पसार झाले.