काँग्रेसच्या पुढाकाराने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत पिंपरी चौकात निदर्शने केली. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रेडसेपरेटरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. काही अपवाद वगळता शहरातील दैनंदिन व्यवहार सुरूच असल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिलाध्यक्षा वैशाली काळभोर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिलाध्यक्षा गिरिजा कुदळे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसने एकत्रितपणे पिंपरीत आंदोलन केले. या वेळी बोलताना वाघेरे म्हणाले, की इंधनदरात जाचक वाढ झाली आहे. भाजप सरकारचे हे अपयश आहे.

मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी पिंपरीत ग्रेडसेपरेटमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. मनसेच्या महिला कार्यकर्त्यां रस्त्यावर झोपल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. महिला पोलीस आल्यानंतर त्यांनी त्या आंदोलकांना ताब्यात घेतले. मनसैनिकांना चिंचवडच्या मोहननगर पोलीस चौकीत आणण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहरात बंदला प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.