काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारण्यास तयार आहोत. मात्र, प्रदेशाध्यक्षपद आपल्यालाच मिळावे यासाठी आग्रही राहणार नाही, असे राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पाटील म्हणाले की, काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिल्लीमध्ये मी नुकताच भेटून महाराष्ट्रातील निवडणुका व सध्यस्थिती याबाबत चर्चा करून अहवाल सादर केला आहे. मात्र, या वेळी प्रदेशाध्यपदाची आपण मागणी केलेली नाही. पण, पक्षाने अशा परिस्थितीत आपल्यावर कोणतीही जबाबदारी टाकली तर ती स्वीकारून समर्थपणे पार पाडू असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेवर जाणार काय, अशी विचारणा केली असता, याबाबत कोणाशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने तो राज्यात विरोधी बाकावर बसेल. भाजपाची सदस्य संख्या कमी असल्याने अल्पमतातील सरकार चालविण्यास त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, असे पाटील म्हणाले.