‘‘पुण्यात काँग्रेसचा पराभव होण्यासाठी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) प्रश्न, मराठा आरक्षण अशी अनेक कारणे होती. त्याचबरोबर पक्षातून काही प्रमाणात दगाफटकाही झाला,’’ असा थेट आरोप काँग्रेसचे लाकसभेचे उमेदवार विश्वजित कदम यांनी केला. ‘‘मोदींची लाट गृहीत धरली, तरी एक ते सव्वा लाख मतेच भाजपकडे जाणारी होती. बाकीची मते कुठे गेली आणि का गेली? हा आमच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीतर्फे कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर कदम पत्रकार परिषदेत बोलत होते. समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, माजी उपमहापौर दीपक मानकर हेही या वेळी उपस्थित होते.
कदम म्हणाले, ‘‘राज्यातील निकाल धक्कादायक आहे. पक्षातील प्रत्येकाला आणि राज्य नेतृत्वाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही पारंपरिक मतदारांना विश्वास देऊ शकलो नाही. योजनांचे ‘मार्केटिंग’ करू शकलो नाही. वेळेअभावी लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही, पुण्यात काही प्रमाणात झालेल्या दगाफटक्याचाही निवडणुकीवर परिणाम झाला. काही लोकांनी अपप्रचार केला, त्याचाही परिणाम झाला. ज्यांनी पक्षविरोधी काम केले, त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी माझी मागणी आहे. याबद्दल मी माझा अहवाल पक्ष नेतृत्वाकडे देणार आहे. नेते आणि कार्यकर्त्यांनी सादर केलेल्या अहवालांवर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.’’
यापुढील काळातील आपल्या योजनांविषयी बोलताना कदम म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताकद देणार आहे. सांगलीतील लोकांनी माझा आक्रमकपणा पाहिला आहे. पुण्यात मी पुण्याच्या संस्कृतीला धरून वागत होतो. पण यापुढे लोकांच्या प्रश्नांसाठी आक्रमक होईन. सत्तेत नसलो तरी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचीच माझी भूमिका राहील.’’ राहुल गांधी यांच्याशी बोलणे झाले का, या प्रश्नावरही आपण राहुल यांच्याशी बोललो आहे. परंतु, त्याबद्दल आपल्याला जाहीर बोलायचे नाही, असे कदम म्हणाले.
‘माझी यादी गोपनीय’
पुण्यात दगाफटका झाला, असे कदम यांनी सांगितल्यावर पत्रकारानी पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या यादीत कोण आहे असा प्रश्न विचारताच, ‘माझी यादी गोपनीय आहे. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना परिणाम भोगावे लागतील,’ असे कदम म्हणाले. आमदार विनायक निम्हण यांच्याविषयी विचारल्यावर मात्र त्यांनी आपण कोणतीही प्रतिक्रिया देण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.