देशात भाजपा सरकार नागरिकांवर जबरदस्तीनं एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायदा लादण्याचा प्रयत्न करत आहे. देशात महागाई वाढत आहे. असं असताना त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना एनआरसी आणि सुधारिक नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माच्या नावावर केंद्र सरकार देशाला विभागण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केला. पुण्यातील काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही धर्माचा असो तो भारतमातेचा सुपुत्र आहे. धर्माच्या नावावर जी राष्ट्र बनतात त्याचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. पाकिस्तानचं काय झालं, पूर्व पाकिस्तानचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. भारतात सर्वांना मानसन्मान आहे. संविधानानं सर्वांना समान हक्क दिले आहेत, याचा मला अभिमान आहे, असं सचिन पायलट यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी संविधान तयार केलं होतं त्यांची दूरदृष्टी पाहिली पाहिजे. जात, धर्म, समुदायावर कोणताही पक्षपातीपणा करण्यात आला नाही. यासाठी आपला देश आज एकसंध उभा आहे. अन्यथा भारत कधीच छोट्या भागांमध्ये विभागला गेला असता. कोणी देशाला कितीही विभागण्याचे प्रयत्न केले तरी सर्व एकसंध राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सध्या देशात जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून सरकारनं संवेदनशीलता दाखवली पाहिजे. तसंच सरकारनं आपला हट्ट सोडला पाहिजे. जे लोकांचं म्हणणं आहे, ते ऐकलं पाहिजे. अनेक सीएए आणि एनआरसीविरोधात आहेत. जे काही देशात घडतंय ते चुकीचं होतंय असं सर्वांचं मानणं आहे. परंतु आमचं कोणी ऐकायला तयार नाहीत, असं पायलट यांनी नमूद केलं. लोकांनी आता भाजपाला आरसा दाखवण्यास सुरूवात केली आहे. झारखंडमध्येही आता निवडणुकांचे निकाल पाहिले असतील. देशातील वातावरण आता बदलत आहे. जे लोक आता अहंकार आणि गर्वाचं राजकारण करत आहेत येता काळ हा त्यांचा नाही, याचं हे उदाहरण असल्याचं त्यांनी सांगितलं.