काँग्रेस पक्षाची कारकीर्द पूर्णपणे अपयशी ठरली असून, सध्या या पक्षाने निवडणुकीत लढा देण्याची इच्छाशक्तीही गमावली आहे. पराभूत होणाऱ्या अशा पक्षातून त्यामुळेच लोक पळून जात असून,जिंकणाऱ्या भाजपच्या मागे येत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तया निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली.
सीतारामन म्हणाल्या की, नरेंद्र मोदी यांच्या सभांना व रॅलीला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळतो आहे. इतरांप्रमाणे ट्रकमध्ये भरून आम्हाला लोक आणावे लागत नाहीत. तर मोदी यांच्या सभेला उत्स्फूर्तपणे लोक येतात. भाजप हा जिंकणारा पक्ष आहे. त्यामुळे छोटे-छोटे पक्ष व इतर पक्षातील लोकांचा ओघ आता भाजपच्या दिशेने सुरू झाला आहे. दुसरीकडे काँग्रेससारख्या हारणाऱ्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत. काँग्रेसला सध्या एकटेपणा आलेला आहे. लढत देण्याची त्यांची ताकदही राहिलेली नाही.
आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांवर केलेल्या टीकेबाबत त्या म्हणाल्या की, काही दिवस का होईना, पण केजरीवाल हे दिल्लीसारख्या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याचे त्यांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. पण, त्यांचे वागणे व बोलणे दिशाभूल करणारे आहे. बदनामीकारक व नकारात्मक प्रतिक्रिया ते व्यक्त करतात. मोदी प्रसारमाध्यमांना मॅनेज करत असतील, तर तसे केजरीवाल यांनी उघड करून दाखवावे. आम आदमी पक्षाच्या बाबतही प्रसारमाध्यमांना मॅनेज केल्याचे बोलले जाते.
भाजपला सध्या देशभरातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पक्षाच्या वतीनेही विविध पद्धतीने निवडणुकीच्या दृष्टीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. विशेषत: नव्या व तरुण मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. अनेकजण स्वयंस्फूर्तीने पक्षाच्या स्वयंसेवकाचे काम करीत आहेत. परदेशात नोकरीला असणारे अनेकजण केवळ निवडणुकीसाठी पक्षाचे स्वयंसेवक होण्यासाठी सुट्टी काढून भारतात आले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार आल्यास होणारे फायदे ते घरोघरी जाऊन सांगत आहेत.
शिवसेनेचा आदर असल्यानेच उद्धव ठाकरेंची भेट
राज ठाकरे व नितीन गडकरी यांची भेट झाल्यानंतर नाराज झालेल्या उद्धव ठाकरे यांची भाजपचे खासदार राजीवप्रताप रुडी यांनी भेट घेतली होती. या प्रकारातून भाजपला शिवसेनेपुढे झुकावे लागले का, या प्रश्नावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यात झुकण्याचा कोणताही मुद्दा येत नाही. शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो. शिवसेनेचा आदर असल्यानेच त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.