महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांचे सूतोवाच

पुणे : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील गैरव्यवहारावरून काँग्रेस पक्षातून निलंबित केलेले पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून उमेदवारी दिली जाऊ  शकते, असे सूतोवाच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस आणि महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

पुणे दौऱ्यावर आल्या असताना सोनल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कलमाडी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली. कलमाडी लोकप्रिय नेते आहेत. सर्व पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी झाल्यास पक्षाकडून त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. कलमाडी हे दावेदार असले तरी पक्षातील अन्य नेतेही निवडणूक लढविण्यास आणिजिंकून येण्यास सक्षम आहेत, असेही त्या म्हणाल्या.

पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तशी वक्तव्य केली आहेत. या पाश्र्वभूमीवर विचारले असता पटेल म्हणाल्या, पुणे लोकसभा ही काँग्रेसचीच जागा आहे. काँग्रेसनेच ही जाग लढवावी, असे सर्वाचेच मत आहे. शहरात काँग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार आहे. काँग्रेसचे शहराशी भावनिक नाते आहे. त्यामुळे काँग्रेकडेच पुण्याची जागा येईल.

आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसह अन्य प्रादेशिक पक्षांनाही त्यात सामावून घेतले जाईल, अशी शक्यता आहे. या महाआघाडीत शिवसेना येईल, अशी कोणतीही शक्यता नाही. आमच्या विचारधारा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शिवसेना येण्याची शक्यता नाही, असेही पटेल यांनी सांगितले.